Type to search

धुळे राजकीय

धुळे जिल्हा प्रशासन सज्ज; तयारी पूर्ण

Share

धुळे । विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्रांना बॅलेट पेपर लावण्यासह उमेदवारांची नावे व पक्षाची चिन्हे असलेली माहिती यंत्रात समाविष्ट करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून त्यानंतर ही यंत्रे सीलबंद करुन स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आली. धुळे शहर विधानसभा मतदार संघासाठी गरुड हायस्कूल येथे तर ग्रामीण विधानसभा मतदार संघासाठी टेकनिकल हायस्कूल येथे कस्टडी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी ईव्हीएम यंत्रे आणल्यानंतर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची धुळे शहर मतदार संघाचे माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली. दरम्यान, दि. 20 रोजी कर्मचार्‍यांना या यंत्रांचे वाटप केले जाणार आहे..

विधानसभा निवडणुकीसाठी दि.21 रोजी मतदान होणार आहे. त्यादृष्टीने आयोगाच्या सूचनेनुसार प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी पूर्ण केली जात आहे. त्यानुसार ईव्हीएम यंत्रांना बॅलेट पेपर लावण्यासह उमेदवारांचे व चिन्हाची माहिती यंत्रात समाविष्ट करण्याचे काम सुरु करण्यात आले होते. धुळे शहर व ग्रामीण मतदार संघासाठी नगावबारी येथील शासकीय गोदामात 20 टेबलांवर ही प्रक्रिया राबविण्यात येत होती. ही प्रक्रिया अधिकारी व उमेदवार, तसेच त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पाडण्यात येत होती. तथापि, यंत्राला बॅलेट पेपर लावण्यासह उमेदवारांची नावे व चिन्हे असलेली माहिती समाविष्ट करण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने दुसर्‍या दिवशी देखील ही प्रक्रिया सुरु होती. सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे सीलबंद करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर ही सर्व यंत्रे ठरावीक वाहनांद्वारे शहरातील स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आली. धुळे शहर विधानसभा मतदार संघासाठी शहरातील गरुड हायस्कूल येथे स्ट्राँग रुम तयार करण्यात आला आहे. तर ग्रामीण

मतदार संघासाठी जेलरोडवरील टेक्नीकल हायस्कूल येथे स्ट्राँग रुम तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे आणल्यानंतर चोख बंदोबस्तात स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आली. ही यंत्रे स्ट्राँग रुममध्ये मध्ये ठेवतांनाचेही चित्रीकरण करण्यात आले. शहर मतदार संघासाठी 286 तर ग्रामीण मतदार संघासाठी 372 केंद्रांसाठी ही मतदान यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, या स्ट्राँग रुमला चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.

20 रोजी यंत्रांचे वाटप
दि.21 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. त्यामुळे एक दिवस अगोदर म्हणजेच दि.20 रोजी या यंत्रांसह निवडणूक साहित्याचे कर्मचार्‍यांना वाटप केले जाणार आहे. तत्पूर्वी कर्मचार्‍यांना पुन्हा एकदा प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही यंत्रे घेऊन ठरावीक वाहनाने सर्व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत पोहचतील. त्यानंतर सायंकाळपर्यंत यंत्रांची जोडणी व मांडणी करतील. धुळे शहर मतदार संघातील कर्मचार्‍यांना गरुड हायस्कूल येथे यंत्रांचे वाटप केले जाईल. तर ग्रामीणच्या कर्मचार्‍यांना टेक्नीकल हायस्कूलमधून यंत्रांचे वाटप केले जाईल. मतदानानंतर पुन्हा याच ठिकाणी स्ट्राँग रुममध्ये हे यंत्रे ठेवून सीलबंद करण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी तिहेरी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याशिवाय संपूर्ण इमारतीच्या परिसरात सीसीटीव्ही, व्हिडीओ कॅमेरांद्वारे चित्रीकरण केले असून 24 तास पोलिसांचा पहारा असणार आहे. तसेच उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याकडून दिवसातून तीनदा या ठिकाणी भेटी देण्यात येणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!