प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा बँकेत शून्य रकमेत पीएम किसान बचतखाते!

0
धुळे । केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या आत धारण क्षेत्रफळ असलेल्या लाभार्थ्यांना मिळण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पीएम किसान बचत खाते उघडण्यासाठी बँकेच्या शाखांना निर्देश दिले आहेत. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी दिली आहे.

भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर केलेली आहे. सदर योजनेंतर्गत अल्प, अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांकडे दोन हेक्टरपर्यंत शेत जमीन आहे. अशा लाभार्थ्यांना वार्षिक रक्कम सहा हजार मदत प्रत्येकी तीन टप्प्यात दोन हजार रुपयांप्रमाणे सदर निधीचे वाटप करण्यात येणार आहे. सदर रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांना पीएम किसान बचत खाते उघडणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेने दोन हेक्टरच्या आत एकत्रित क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यांची खाते पीएम किसान बचत खाते शुन्य शिल्लक रक्कमेवर उघडण्यात येणार आहे. असे श्री. कदमबांडे यांनी सांगितले.

लाभार्थ्यांनी आपल्या क्षेत्राचा सातबारा उतारा, खाते उतारा यांच्या प्रती, आधारकार्ड, मतदान कार्ड, नरेगा जॉबकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, शासकीय अधिकारी यांनी प्रमाणीत केलेला दाखला यापैकी एक केवायसी पुरावा व मोबाईल नंबर आदी कागदपत्र आवश्यक आहे. लाभार्थ्यांची खाते जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये उघडण्याचे निर्देश दिले आहेत. असे श्री. कदमबांडे यांनी सांगितले.

किसान क्रेडीट खातेदारांना खाते उघडण्याची गरज नाही!
ज्या शेतकरी लाभार्थ्यांची किसान क्रेडीट कर्ज खाते असतील अशा लाभार्थ्यांना नवीन खाते उघडण्याची गरज नाही. त्यांनी संलग्न शाखेशी संपर्क साधून सातबारा उतारा, खाते उतारा देवून खाते सुरु करुन घ्यावे व किसान कार्ड प्राप्त करुन घ्यावेत. ज्या लाभार्थ्यांची बचत खाते बँकेत आहेत. परंतु व्यवहार नसल्याने खाते बंद असल्यास नवीन केवायसी पुरावा देवून धारण क्षेत्राचा सातबारा उतारा व खाते उतारा बँकेत देवून सदर खाते शुन्य शिल्लक रकमेने सुरु करुन घ्यावेत.
– राजवर्धन कदमबांडे,
अध्यक्ष, जिल्हा बँक

LEAVE A REPLY

*