Type to search

धुळे

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी

Share

धुळे | भारत निवडणूक आयोगान विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून दि. २१ ऑक्टोबर रोजी मतदान, तर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभाग प्रमुखाने सतर्क राहून आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सायंकाळी सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा चव्हाण, श्रीकुमार चिंचकर (भूसंपादन), गोविंद दाणेज (रोहयो), भीमराज दराडे (उपविभागीय अधिकारी, धुळे), सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घ्यावे. संबंधित विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षांचे बॅनर, होर्डिंग्ज, फलक, पोस्टर तत्काळ काढून विहित वेळेत अहवाल सादर करावेत. माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत. सोशल मीडियाच्या नियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या स्तरावर स्वतंत्र पथक गठित करण्यात येईल. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही या मोबाईल ऍपचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या ऍपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येईल. त्याच्यावर १०० मिनिटांत कार्यवाही पूर्ण करावयाची आहे. निवडणूक कामासाठी प्रतिनियुक्त कर्मचार्‍यांना संबंधित विभागप्रमुखांनी तत्काळ कार्यमुक्त करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री.गायकवाड यांनी सांगितले, महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शासकीय वाहने, कर्मचारी किंवा यंत्रणेचा निवडणूक प्रचार विषयक कामासाठी वापर होणार नाही याची प्रत्येक विभागप्रमुखाने दक्षता घ्यावी. शासन किंवा सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ नियुक्त्या करू नयेत. कोणत्याही व्यक्तीला अन्य कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत, आदींचा वापर त्याच्या परवानगी विना ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटीशी चिटकवणे किंवा घोषणा आदी लिहिण्यासाठी वापर करता येणार नाही. यामध्ये खासगी व सार्वजनिक जागांचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.भामरे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. यावेळी पोलिस अधीक्षक श्री.पांढरे, उपविभागीय अधिकारी श्री.दराडे यांनी मार्गदर्शन केले.

आचारसंहिता लागताच काढण्यात आले फलक व बॅनर्स

विधानसभा निवडणुकीसाठी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील पाचही मतदार संघात ही आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू होताच लावण्यात आलेले विविध पक्षांचे बॅनर्स, फलक व झेंडे पथकाकडून काढण्यात आले. शहरात ही कारवाई महापालिकेतर्फे करण्यात आली. यापुढे परवानगीशिवाय राजकीय पक्षांना किंवा अन्य व्यक्तीला राजकीय बॅनर्स, फलक व झेंडे लावता येणार नाही. फलक व बॅनर्स लावलेले आढळून आल्यास पथकाकडून कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती

जिल्ह्यातील पाचही मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात साक्री साठी उपजिल्हाधिकारी गोविंदा दाणेज, धुळे ग्रामीणसाठी उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे, धुळे शहरसाठी उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, शिंदखेड्यासाठी उपजिल्हाधिकारी श्रीमती सुरेखा चव्हाण, शिरपूरसाठी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न

लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दि. २१ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर पर्यंत मतदार जागृती रॅली काढण्यात येणार आहे. तसेच आज सर्व शाळांमध्ये मतदार जागृतीबाबत शपथ घेण्यात आली. जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये २० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर पर्यंत पत्र लेखनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यात विद्याथी हा त्याचे पालक व नातेवाईकांना मतदान करा म्हणून पत्र पाठविणार आहे. तसेच सर्व शाळांमध्ये व महाविद्यालयांमध्ये पालक सभा, पालक मेळावा घेवू मतदान संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.

पथनाट्य, नाटीका, एकांकीका सादर करून मतदान जनजागृती करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत त्या-त्या गावांमध्ये बाजाराच्या दिवशी मतदान जनजागृती करण्यात येणार आहे. महाविद्यालयांमध्ये कॅम्पस ऍम्बेसिडरची नियुक्ती करण्यात येवून नवीन मतदारांना नोंदणी करण्यासाठी जागृती करण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्यासाठी राष्ट्रीय स्थरावर पारितोषिक प्राप्त केलेल्या दिव्यांग खेळाडूंची आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वोटर्स अवेरनेस कोरम स्थापन करण्यात येणार आहेत. सर्व शासकीय कार्यालय व महाविद्यालयांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणी बाबत प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. मतदारांना त्यांचे ओळखपत्र व निवडणूक विषयक समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वीत करण्यात आला आहे. त्याचा वापर मतदारांनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!