Type to search

धुळे

कापडण्यात शोषखड्ड्यांच्या कामांची समितीकडून चौकशी

Share

कापडणे | येथे शोषखड्ड्यांच्या कामात अपहार झाल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आज दि.१६ रोजी येथे चौकशी समितीने शोषखड्डे कामाची चौकशी केली. चौकशी समितीसमोरच दोन गटात हमरीतुमरी झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी चौकशी समिती ठरल्याप्रमाणे चौकशी करत असल्याचा आरोप करत तक्रारदारांनी ग्रा.पं.कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत समितीचा निषेध व्यक्त केला. तर तक्रारींनुसार वेगवेगळ्या भागात जावुन कामाची प्रत्यक्ष सखोल चौकशी केली असुन तसा एकत्रित अहवाल जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात येईल, असे चौकशी समितीने सांगितले.

येथील शोषखड्ड्यांचील अपहारसंदर्भात काही दिवसापूर्वी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले होते. यात, सन २०१५-१६ या वर्षात रोजगार हमी योजनेंतर्गत सुमारे ७०० शोषखड्डे येथे मंजुर करुन ते काम कागदोपत्री दाखवित त्याचे अनुदान काढण्यात आल्याची तक्रार धुळे जिल्हाधिकारींकडे करण्यात आली होती. यात प्रत्यक्षात एकही शोषखड्डा करण्यात न येता योजना फक्त कागदोपत्री दाखवून अनुदान हडप करण्यात आले असल्याचे म्हटले होते. तसेच शासकिय कागदोपत्रांमध्ये ज्या ग्रामस्थांना लाभार्थी म्हणुन दाखवुन पैसे काढण्यात आले आहेत, त्या ग्रामस्थांना या योजनेविषयी आजदेखील कोणतीच माहीती नसल्याचे या तक्रारीत म्हटले होते. गावातील १५ अंगणवाडया, ५ जि.प.शाळा, ४ माध्यमिक शाळा आदी ठिकाणी देखील शोषखड्डे झाल्याचे दाखवुन त्याचे अनुदानही काढण्यात आले, परंतु प्रत्यक्षात एकाही ठिकाणी शोषखड्डे झालेले नाही, आदी तक्रारी या निवेदनात करण्यात आल्या होत्या. सदर प्रकरणात ठेकेदार, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, रोजगार सेवक तसेच प्रशासनातील अधिकार्‍यांनी संगनमत करुन अपहार केला असुन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर येथे चौकशी समितीने येत कामाची चौकशी केली.

या त्रिस्तरीय समितीत पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता जयदिप आर.पाटील, धुळे पं.सं.चे विस्तार अधिकारी कपील वाघ व श्री.सागळे यांचा समावेश होता. सदर त्रिस्तरीय समिती कापडणे ग्रा.प.कार्यालयात दाखल झाली. दरम्यान या प्रकरणी तक्रारदारांनी हजर राहण्याबाबत लेखी कळविले होते. त्यानुसार तक्रारदार ललीत बोरसे, प्रकाश माळी, ग्रा.प.सदस्य भटू पाटील, सतिष पाटील, संतोष पाटील, योगेश पाटील, बन्सीलाल पाटील, विठोबा झुलाल माळी आदी उपस्थित होते. तर दुसर्‍या गटातर्फे महेंद्र पाटील, भुषण पाटील, अशोक पाटील आदी उपस्थित होते. समितीसमोरच दोन गटात हमरीतुमरी झाल्याने ऐनवेळी सोनगीर पोलीसांना पाचारण करण्यात आले. पुढील चौकशी ही पोलिसांच्या उपस्थीतीतच झाली. तसेच चौकशीच्या वेळी समिती ही ठरल्याप्रमाणे चौकशी करत होती, असा आरोप यावेळी तक्रारदारांनी करत ग्रा.पं.कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला. तक्रारदारांचे ऐकुन न घेता समिती ही ज्याच्याविरोधात तक्रारी आहेत त्या व्यक्तीलाच गाडीत घेऊन फिरत होती. तसेच ज्या ठिकाणी तक्रारदारांनी सांगितले त्याठिकाणी चौकशी झाली नाही. म्हणुन ही चौकशी पारदर्शक झालीच नाही, या चौकशी समितीवरच आपला आक्षेप आहे, अशी प्रतिक्रीया तक्रारदार प्रकाश माळी यांनी यावेळी दिली. यात प्राथमिक शाळा, विविध रहिवाशी भाग यात जावुन सखोल चौकशी करण्यात आली असुन चौकशीअंती अहवाल वरीष्ठ स्तरावर पाठवला जाईल, असे यावेळी चौकशी समितीतील जयदिप पाटील यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!