Type to search

maharashtra धुळे राजकीय

स्वकीयांची नाराजी डॉ.भामरेंच्या मुळावर!

Share
धुळे । मतदारसंघात सध्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. भाजपाचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि काँग्रेसचे आ.कुणाल पाटील, लोकसंग्रामचे आ.अनिल गोटे यांच्यात तिरंगी सामना रंगला आहे. भाजपाचे डॉ.भामरे यांना विजयाचा विश्वास सुरूवातील पासूनच आहे. या विश्वासाचे रूपांतर अती आत्मविश्वासात झाल्यामुळे त्यांची अवस्था चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी झाल्याचे सध्यातरी चित्र आहे. भाजपातील अनेक अनुभवी निष्ठावंतांना बाजूला करून इतर पक्षातील आयारामांना मानाचे स्थान देण्याची भुमिकाच आता डॉ. भामरेंसाठी अडचणीची ठरू पहात आहे. पक्षाने अडगळीत टाकलेले निष्ठावंत आज निवडणूकीच्या रणधुमाळीत निष्क्रीय असल्याने डॉ.भामरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

अनुभवाचा अभाव
डॉ.भामरे हे कर्करोग तज्ज्ञ आहेत. राजकारणातील अतिशय शालीन व्यक्तीमत्व म्हणून त्यांची पाच वर्षापूर्वी धुळ्याच्या राजकीय पटलावर स्वतंत्र ओळख होती. वैद्यकीय क्षेत्रात शिखर गाठल्यानंतर डॉ.भामरे यांना राजकारणाची ओढ लागली. शिवसेनेकडून उमेदवारी पदरात पाडून घेत त्यांनी विधानसभा लढविली. मात्र, डॉ.भामरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुर्देवाने निवडणूकीचा अनुभव डॉ.भामरेंना वाईटच आला. मात्र, यानंतर 2014 मध्ये भाजपात प्रवेश करून मोदी लाटेत डॉ.भामरे यांनी लिलया विजय संपादन केला. यानंतर राज्यमंत्रीपदही भुषविले. डॉ.भामरेंचा राजकीय आलेख वेगाने उंचावला. हे यश सुरूवातीला नरेंद्र मोदींमुळेच शक्य असल्याचे मानणारे डॉ.भामरेंना कालांतराने जिल्ह्याच्या नेतृत्वाची ओढ लागली आणि राजकीय अनुभव नसलेल्या डॉ.भामरेंनी स्वकियांना बाजुला सारून विरोधकांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. मनपा निवडणूकीत याचा कळस गाठला गेला. स्वपक्षातील मातब्बरांना साईड ट्रॅक करण्याचे धोरण डॉ.भामरेंनी अवलंबले. आज नाराज स्वकीयांची हीच मंडळी डॉ.भामरेंची डोकेदुखी ठरू पहात आहेत.

सुनील नेरकर अज्ञातवासात
भाजपाचे निष्ठावंत, तत्कालीन जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर हे आज अज्ञातवासात आहेत. डॉ.भामरे यांच्या विजयात सुनील नेरकर यांचा वाटा सिंहाचा होता. डॉ.भामरे यांनी थेट उमेदवारी आणली. मात्र, धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भाजपाची भक्कम मोट बांधण्यासाठी सुनील नेरकर यांनी केलेले परिश्रम सर्वश्रृत आहेत. श्री.नेरकर यांनी प्लॅटफॉर्म तयार केल्यामुळेच डॉ.भामरे यांचा विजय सुकर झाला हे भाजपाचा प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता मानतो. मात्र, निकालानंतर काही महिन्यातच डॉ.भामरे यांनी सुनील नेरकर यांना अनुल्लेखाने टाळण्याचा प्रयत्न केला. श्री.नेरकर म्हणजे आ.खडसेंचे मानसपुत्र, आ.खडसेंची राजकीय कोंडी झाल्यानंतर धुळ्यातही चित्र बदलले. डॉ.भामरे यांनी श्री.नेरकर यांना टाळण्यास सुरूवात केली. खडसेंचा मानसपुत्र आपल्यासोबत राहिला तर श्रेष्ठींची नाराजी शक्य असल्याने सुनील नेरकर यांची त्यांना अडचण वाटू लागली. आपली निष्ठा सिध्द करण्यासाठी मग सुनील नेरकर यांचा राजकीय बळी देण्यात आला. त्याचे जिल्हाध्यक्षपद तडकाफडकी काढून अनुप अग्रवाल या ठेकेदारांची वर्णी डॉ.भामरे यांनी लावू घेतली. सुनील नेरकर आणि अनुप अग्रवाल यांच्यात तुलना करायची म्हटली तर सुनील नेरकर म्हणजे प्रचंड लोकसंग्रह असलेला नेता म्हणून श्री.नेरकर हेच उजवे ठरतील. मात्र, आज हेच सुनील नेरकर हे राजकीय अज्ञातवासात गेले आहेत. त्यांची अनुपस्थिती ही डॉ.भामरे यांच्या अडचणीत निश्चितच वाढ करणारी असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.

अ‍ॅड.पाटील यांचाही अवमान
नगाव येथील अ‍ॅड.राहुल पाटील हे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते. स्वकर्तृत्वावर त्यांनी भाजपाचे तालुकाध्यक्षपद भुषविले. नगाव येथील भदाणे कुटूंबियांसोबत त्यांचे वाद सर्वश्रृत आहेत. भदाणे कुटूंबिय डॉ.भामरेंच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना खुश करण्यासाठी अ‍ॅड.पाटील यांची सहा महिन्यापूर्वीच उचलबांगडी करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता पक्षातंर्गत लोकशाही मानणार्‍या भाजपाने सर्व निकष बाजूला सारून काँग्रेसमधून आलेले हॉटेल व्यावसायीक देवेंद्र पाटील यांची तालुकाध्यक्षपदी थेट नियुक्ती केली. निष्ठेने काम करणार्‍या अ‍ॅड.राहुल पाटील यामुळे दुखावले गेले आहेत. चूक लक्षात आल्यानंतर त्यांना जिल्हा उपाध्यक्षपद देण्यात आले. मात्र, यामुळे आत्मसन्मान दुखावलेले अ‍ॅड.पाटील यांची नाराजी दुर झाल्याची सध्या तरी परिस्थिती दिसत नाही. अ‍ॅड.पाटील सध्या तरी सक्रीय नसल्याचे चित्र असून याची किंमत डॉ.भामरे यांना मोजावी लागेल अशी शक्यता जाणकारांना वाटत आहे.

अ‍ॅड.दुसाने यांनाही आव्हान
भाजपाचे निष्ठावंत, विद्यापिठाचे सिनेट सदस्य असलेले अ‍ॅड.अमीत दुसाने यांनाही प्रतिस्पर्धी तयार करण्याचे काम डॉ.भामरे यांनी केल्याचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाटत आहे. अ‍ॅड.दुसाने यांनी मनपात उमेदवारी मागितली होती. मात्र, रात्रीतून राष्ट्रवादीचे नंदू सोनार यांना पक्षात प्रवेश देवून उमेदवारी देण्यात आली. याचे शल्य आजही अ‍ॅड.दुसाने यांना बोचत आहे. अ‍ॅड.दुसाने आणि नंदू सोनार यांच्यात आजही धुसफूस सुरू आहे. नुकतीच सोनार यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार अ‍ॅड.दुसाने यांनी पोलिसात दिल्याचे वृत्त आहे. स्वकीयांच्या खच्चीकरणाचे राजकारण डॉ.भामरे खेळत असल्याची किंमत डॉ.भामरेंना मोजावीच लागले अशी भावना कार्यकर्ते उघडपणे बोलून दाखवत आहेत.

संजय बोरसेही नाराज
नाराजांच्या यादीत शेवटचे नाव येते ते संजय बोरसे यांचे. भाजपाचे निष्ठावान, नमा मी गंगे अभियानाचे जिल्हाध्यक्ष असलेले संजय बोरसे यांना मनपा निवडणूकीच्या निर्णय प्रक्रियेत समाविष्ठ करणे कार्यकर्त्यांना अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही. सन्मानाने उमेदवारी तरी मिळेल अशी अपेक्षाही पुर्ण झाली नाही. यामुळे बोरसे समर्थक संतापात असतांनाच उमेदवारी द्यायला घरी येवू का? हे भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचे विधान असंतोषात वाढ करणारे ठरले आणि संजय बोरसे डॉ.भामरेंपासून दुरावल्याचे चित्र आहे.

वरील सर्व मंडळी भाजपाचे निष्ठावान पदाधिकारी आहेत. आपली नाराजी ते उघडपणे मान्य करणारही नाहीत. कारण त्यांची निष्ठा आजही भाजपावरच कायम आहे. नाराजी आहे ती फक्त डॉ.भामरे यांच्या भुमिकेवर. म्हणूनच निष्ठावंतांच्या या चक्रव्यूहात डॉ.भामरे यांची अवस्था सध्यातरी चक्रव्यूहातील अभिमन्यू सारखीच झाल्याचे जाणकारांना वाटते.

अहंकार आणि पराभव…
शास्त्रों वेदोंमें निपुण दशानन,
अहंकारसे हारा ग्यान।
धर्म अधर्मका भेद भुलाकर,
बन बैठा हैवान।

रावण हा महान योद्धा पण रामायणतला खलनायक होता. गुणी, शक्तिशाली, शिवभक्त दानव अहंकारामुळे स्वतःशीच हरला. श्रीराम जिंकले कारण त्याच्या भाऊ लक्ष्मण सोबत होता. रावण हरला कारण त्याचा भाऊ विभीषण त्याच्या सोबत नव्हता. कोणतीही लढाई लढतांना आपली माणसं सोबत असलेल्याचाच विजय निश्चित असतो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!