Type to search

धुळे

धुळ्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देवू

Share

धुळे | धुळे शहर आखीव-राखीव असून शहराची रचना सर विश्‍वेश्‍वरैया यांनी केली आहे. पंरतू मधल्या काळात शहराच्या विकासासाठी निधी मिळाला नाही. परंतू भविष्यात शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देवू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रपरिषदेत दिले.

भाजपाच्या महाजनादेश यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याला काल धुळे शहरापासुन सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यात महारॅली, सायंकाळी दोंडाईचा तर रात्री नंदुरबार येथे जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री येथे मुक्कामी होते. तर आज दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा खा. डॉ. सुभाष भामरे, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, महापौर चंद्रकात सोनार, सुजितसिंग ठाकूर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाजनादेश यात्रेत पहिल्या टप्प्यात दहा जिल्हे पुर्ण झाले. त्यानंतर महाराष्ट्रात भिषण पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. यात्रेचा दुसरा टप्पा धुळ्यापासुन सुरू झाला. एकुण ४३ विधानसभा क्षेत्रात यात्रा जावुन आली असून १ हजार १६५ किलोमिटर फिरली आहे. उत्तर महाराष्ट, मराठवाडा व विदर्भातील राहिलेला एक जिल्हा करून सोलापूरला दुसरा टप्पा संपवुन दि. १३ ते १९ सप्टेंबर या कालावधीत तिसर्‍या टप्प्यात कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रात यात्रा पुर्ण होईल. या महाजनादेश यात्रेचा उत्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. नागरिकांच्या अनेक अपेक्षा आहेत. हे सरकारच त्या पुर्ण करू शकतील. देशासह राज्यात नागरिकांचा कल भाजपाकडे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात युतीला मोठे बहुमत मिळेल. राज्यात अनेक विकास कामे झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकवर आहे. आगामी पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करू, असा शब्दही त्यांनी दिला.

यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथे काय केले हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. आम्ही सत्तेवर येण्याआधी इतर राज्ये विकासात पुढे होती. मात्र युती शासन आल्यानंतर आज कोणत्याही क्षेत्रात राज्याचा पहिल्या तीनमध्ये क्रमांक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

धुळे जिल्ह्यातील ५०४ गावात जलयुक्ती शिवार योजनेतर्ंगत २ हजार ४० कोटींची कामे झाली. त्यातून ६२ हजार टीएमसी पाणी उपलब्ध झाला आहे. खान्देशात दहा लाख शेतकर्‍यांना विविध योजनेतून ४ हजार ६०० कोटींची मदत दिली. धुळे जिल्ह्यात उज्वला योजनेतून १ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. याबरोबच शहरात अक्कलपाडा ते धुळे पाणीपुरवठा योजनेतसाठी १७० कोटी, भुमिगत गटारींसाठी १५० कोटी, रस्त्यांसाठी १०० कोटी दिले असून कामेही सुरू झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. धुळे शहरात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याची चौकशी करून कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले.

तसेच महापुरामुळे अतिक्रमण व अवरोधांचे ऑडिट करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी अन्य प्रश्नांची उत्तरे देतांना सांगितले.

मनमाड-इंदूर रेल्वेमर्गाचे भुसंपादन सुरू
मनमाड-इंदूर रेल्वेमर्गाचे भुसंपादन सुरू झाले आहे. धुळे शहर मध्यवर्ती केंद्र आहे. परंतू कनेक्टीव्ही थांबली होती. आता रेल्वे मार्गामुळे व डीएमआयसीमुळे जिल्ह्याच्या प्रगतीला चालना मिळेल, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरण, वाडी-शेवडी प्रकल्प, मनमाड-इंदूर रेल्वे मार्गामुळे आगामी काळात धुळे जिल्हा समृध्द होईल. यासह मेघा रिचार्जसह इतर प्रकल्पामुळे उत्तम महाराष्ट्रातील अनियमिता दुर होईल. वाडीशेवाडी प्रकल्पासाठी ना. जयकुमार रावल, खा. सुभाष भामरे, ना. गिरीष महाजन यांनी प्रयत्न केल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पंधरा दिवसात आयुक्तांची नियुक्ती करू
धुळे महापालिकेत गेल्या दोन ते तीन महिन्यापासुन आयुक्त नाही. तुम्हाला टिकणारे आयुक्त द्यायचे आहेत, असे सांगत येत्या पंधरा दिवसात आयुक्तांची नियुक्त करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आता अनेकांना यात्रा काढण्याचा उत्साह
आम्ही महाजनादेश यात्रा सुरू केल्यानंतर अनेकांना यात्रा काढण्याचा उत्साह आला, असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना लगावला. आम्ही महाजनादेश यात्रा काढल्यानंतर अनेक पक्षांना यात्रा काढण्याचा उत्साह आला आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. पण खरतर यात्रा काढण्याची परंपरा ही भाजपाची आहे. आम्ही विरोधात असतांना संघर्ष यात्रा काढली होती. आता आम्ही संवाद यात्रा काढत आहोत. आमच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पक्षप्रवेशासाठी आता नेत्यांना फिल्टर पॉलिसी
पत्रपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधाला. ते म्हणाले की, विरोधी पक्षांनी मेघा भरतीची चिंता करून नये, तर आपल्या मेघा गळतीची चिंता करावी, असा उपरोधिक टोला लगावला. भाजपत इतर पक्षांमधून मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांसाठी अद्याप प्रवेशासाठी मोकळीक आहे. परंतु आता नेते जास्त व आमच्या जागा कमी आहेत. त्यामुळे नेत्यांसाठी आता फिल्टर पॉलिसी अवलंबली जाणार असून स्कॅनिंगनंतरच यापुढे त्यांना प्रवेश दिला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!