Type to search

धुळे

जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये महाराष्ट्राला पर्यटन रीसॉर्टसाठी जमीन द्यावी

Share

दोंडाईचा | महाराष्ट्रासह देशातील पर्यटकांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पर्यटन रिसॉर्ट उघडण्याची योजना असून यासाठी केंद्र व संबंधित केंद्रशासीत प्रदेशांनी जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी पर्यटन मंत्र्यांच्या राष्ट्रीय संमेलनात केली.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे आयोजित राज्यातील पर्यटन मंत्र्यांच्या राष्ट्रीय संमेलनात पर्यटन मंत्री रावल यांनी ही मागणी केली. या संमेलनात देशातील विविध राज्याचे पर्यटन मंत्री उपस्थित होते.

ना.रावल म्हणाले की, महाराष्ट्र हे विविध क्षेत्रात आघाडीवरील राज्य आहे.राज्याची हिच ओळख पर्यटन क्षेत्रातही निर्माण व्हावी म्हणून पर्यटन मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. याचाच एकभाग म्हणून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पर्यटन रिसॉर्ट उभारण्याची योजना आहे, त्यासाठी केंद्र सरकार व जम्मू काश्मीरच्या राज्यपालांशी प्राथमिक चर्चा झाली असून या रिसॉर्टसाठी जमीन उपलब्ध होण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. लवकरच यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या बैठकीत या रिसॉर्टसाठी निधी उपलब्धतेस मंजुरी देण्यात येणार असल्याचे ना. रावल यांनी सांगितले. अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवीचे दर्शन व अन्य पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून पर्यटक आणि भावीक जम्मू काश्मीर व लडाखमध्ये येत असतात पर्यटन रिसॉर्टच्या माध्यमातून पर्यटक व भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. अशा प्रकारचे पर्यटन रिसॉर्ट सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असेही ना. रावल म्हणाले. सुविधा विकासासाठी पुरातत्व विभागाने नियम शिथील करावे.

राष्ट्रीय पुरातत्व विभागाच्या कठोर नियमावलीमुळे राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होत असल्याची बाब श्री.रावल यांनी या संमेलनात मांडत हे नियम शिथील करण्याची मागणी केली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी यास सकारात्मकता दर्शविली आहे. श्री.रावल यांनी या संदर्भात सांगितले, महाराष्ट्रातील बरेचसे किल्ले आणि पर्यटन स्थळांवर राष्ट्रीय पुरातत्व विभाग देखरेख ठेवते मात्र, या विभागाच्या कठोर नियमावलींमुळे राज्य शासनास पर्यटकांना सोयी उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होत आहे. मुख्यत: जगप्रसिध्द अजिंठा आणि वेरूळ येथील लेणी परिसरात पर्यटक पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या अडचणींबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. तसेच पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणार्‍या राज्यातील पर्यटनस्थळांना पर्यटकांनी भेट देण्याची सध्याची असलेली वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून ती सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यास केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली.

केंद्र पुरस्कृत स्वदेश दर्शन व प्रसाद योजनेंतर्गत राज्यातील मंजूर प्रकल्पांच्या सद्य:स्थितीबाबतही श्री. रावल यांनी माहिती दिली. स्वदेश दर्शन योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून सीआरझेडच्या नियमांमुळे या योजनेच्या अंमलबजावणीचा वेग मंदावल्याचे सांगितले. प्रसाद योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तिर्थक्षेत्राच्या विकासाबाबतही त्यांनी माहिती दिली. योजनेंतर्गत ९० टक्के कार्य झाले असून येत्या अठरा महिन्यात संपूर्ण कार्य पूर्ण करण्यात येईल, असे रावल यांनी यावेळी सांगितले.

रायगड किल्ल्याच्या विकास कार्यास गती देण्यासाठी स्थापन करण्यात आलेले रायगड किल्ला विकास प्राधिकारणाची माहितीही रावल यांनी दिली. संभाजीनगरला जागतिक वारसा दर्जाचे शहर व्हावे अशी राज्य शासनाची योजना असून यासंदर्भात केंद्राकडून आवश्यक मदत मिळावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!