प्रचार करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई!

पडताळणीसाठी पथक : तक्रारीची दखल - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रेखावार

0
धुळे । धुळे लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून उमेदवारांचा काही कर्मचारी प्रचार करीत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. या संशयित कर्मचार्‍यांची निगराणी करण्यात येत असून तक्रारीची सत्यता पडताळणीसाठी विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी म्हटले आहे, भारत निवडणूक आयोगाने 10 मार्च पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली असून त्या दिवसापासून 02- धुळे लोकसभा मतदारसंघात आचारसंहितेचा अंमल सुरू झाला आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 कफ नुसार शासकीय सेवेतील एखाद्या व्यक्तीने, उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधी या नात्याने निवडणुकीत काम केले, तर ती व्यक्ती तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या कारावासास किंवा द्रव्य दंडास किंवा दोन्ही शिक्षास पात्र होईल.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 क (1) चा उपकलम (ड) मध्ये नमूद केल्यानुसार शासकीय सेवेतील (शासकीय, निमशासकीय कार्यालये व शासन अनुदानित संस्थांमधील) कोणत्याही व्यक्तीने, कोणत्याही उमेदवाराच्या निवडणुकीवर अनुकूल परिणाम व्हावा यासाठी पूर्वोक्त सर्व किंवा कोणत्याही कृती करणे किंवा अशा कृती करण्यास साहाय्य करण्यास किंवा त्यांना मुकानुमती देणे आदी कृती केल्यास उक्त अधिनियमाच्या कलम 2 चे पोटकलम (1) अन्वये शिक्षापात्र अपराध दखलपात्र असेल. यात कोणतेही सरकारी अनुदान प्राप्त करणारे सर्व कर्मचारी या अंतर्गत समाविष्ट आहेत.

या व्यतिरिक्त अशा व्यक्तींविरुध्द संबंधित कार्यालयास लागू असलेले वर्तणूक नियम, शिस्त व अपील नियमातील तरतुदी लागू असतील ज्या अन्वये मा. सर्वोच्च न्यायालयाने 2000 मध्ये दिलेल्या निकालान्वये शिस्तभंग कारवाईचे अधिकार भारत निवडणूक आयोगास आहेत. अशा सर्व प्रकरणात 6 महिन्यांच्या आत निवडणूक विषयक गैरकृत्याबाबतची शिस्तभंगाची कारवाई 6 महिन्यांच्या आत पूर्ण करणे शिस्तभंग प्राधिकार्‍यास अनिवार्य केलेले आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*