Type to search

धुळे

डेंग्यूसदृश आजारांवर मात करण्यासाठी प्रभागनिहाय मोहीम – आयुक्त अजिज शेख

Share

धुळे । डेंग्यू व सदृश्य आजांरावर मात करण्यासाठी महापालिकेने व्यापक प्रभाग निहाय मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मलेरीया क्षेत्रीय अधिकारी, सनियंत्रण अधिकारी, आशा वर्कर व मलेरीया कर्मचार्‍यांची बैठक आयुक्त अजीज शेख यांनी घेतली.

सद्य:स्थितीत डासांचा पारेषण काळ असल्यामुळे डासांची उत्पत्ती थांबविणे व डासांचा नायनाट करणे यासाठी प्रथमतः लक्ष केंद्रित करण्यात येत असून कालबद्ध व नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यात शहराचे स्वच्छता निरीक्षक यांच्या अंतर्गत येत असलेले नऊ भाग तयार करण्यात आलेले असून यात प्रत्येक स्वच्छता निरीक्षकाच्या अधिपत्याखाली एकूण 30 कर्मचारी पथक देण्यात आलेले आहे यात दहा आशा वर्कर व नर्सेस तसेच पाच स्वच्छता कर्मचारी व दहा मलेरिया मानधनावरील कर्मचारी, पर्यवेक्षक, मुकादम अशा 30 कर्मचार्‍यांचे पथक तयार करण्यात आलेले आहे. यात एकूण 270 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती ही प्रामुख्याने स्वच्छ पाण्यात होत असते. त्यामुळे संपूर्ण शहरात प्रत्येक घर स्तरावर प्रत्यक्ष पाहणी व भेट देऊन त्यांच्यामार्फत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यात महिला कर्मचारी प्रत्येक घराच्या आतील भागातील पाहणी करतील यात प्रामुख्याने फ्रीज, कुलर, फुलदाणी तसेच उघडे पाण्याचे साठे व अळगळीतील जागा शोधण्यात येणार आहेत. पुरुष कर्मचार्‍यातर्फे घराच्या बाहेरील परिसराची पाहणी करून डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करणे तसेच प्रत्येक घरातील रिकाम्या न करता येणार्‍या पाणी साठ्यात अ‍ॅबेटींग करतील. प्रत्येक प्रभागात धुरळणी करण्यात येईल. अतिरिक्त उघड्यावरील पाण्याचे साठे नष्ट करून कार्यवाही घरस्तरावर करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 12 धुरळणी यंत्र तसेच वाहनावरील दोन मोठे धुरळणीयंत्र व एकुण 32 फवारणी यंत्र याद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे.

सदर पथकासोबत जिल्हा हिवताप कार्यालयाकडील कर्मचारी रक्त तपासणीचे नमुने घेण्यासाठी नियुक्त केलेले आहेत. येत्या दहा दिवसात संपूर्ण शहरात व प्रत्येक घरा-घरात सदरची मोहीम राबविण्यात येणार असून याबाबत संबंधित कर्मचार्‍यांना आवश्यक ते आदेश व सूचना देण्यात आलेले आहेत. सदरची संपुर्ण कार्यवाही येत्या सोमवारपासुन राबविण्यात येणार आहे.

सदरची कार्यवाही ही सामुहिक स्वरुपाची असल्यामुळे शाळा, वस्तीगृह, अपार्टमेंट, कार्यालय व महाविद्यालय इत्यादी ठिकाणी असणारे संभाव्य डासांची उत्पत्ती स्थळे तातडीने नष्ट करण्याबाबत संबंधितांना यावेळी सुचना दिल्या आहेत.

डेंग्यूच्या आजाराच्या निश्चितीसाठी तपासणी करणे आवश्यक आहे तसेच शासन निर्देशानुसार या आजाराच्या निश्चित निदानासाठी रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किट वापर करण्यात येऊ नये असे निर्देश आहेत शहरातील पॅथॉलॉजी लॅब मध्ये वरील प्रमाणे कार्यवाही न करता रुग्णास डेंगू पॉझिटिव्ह म्हणून निदान करण्यात येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे सहाजिकच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहेत. याबाबत संबंधित पॅथॉलॉजी लॅब व रुग्णालयांना नोटिसा देण्यात येत असून याबाबत शासन निर्देशांचे पालन न झाल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.

शहर हद्दीतील दवाखान्यांमध्ये संशयित रुग्ण दाखल झाल्यास तातडीने याबाबत महापालिकेस माहिती देणे आवश्यक आहे अन्यथा अशा रुग्णालयांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही महापालिका मार्फत करण्यात येणार आहे. डेंग्यूू व अन्य सदृश्य आजाराबाबत नागरिकांनीही सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे यासाठी महापालिकांमार्फत जाहिरात फलक तसेच प्रत्येक घर स्तरावर प्रबोधनासाठी जनजागृतीसाठी पत्रके वाटण्यात येणार आहे तसेच कचरा संकलनासाठी असणार्‍या घंटागाडीच्या ध्वनीफितीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या रोगांबाबत जनजागृती व प्रबोधन आवश्यक असल्याने नागरिकांनी स्वतःहून काळजी घेऊन आपल्या घराजवळील व घरातील अनावश्यक पाण्याचे साठे तरी कमी करून वारंवार स्वच्छता करून किमान सात दिवसातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे.

महापालिका मार्फत प्रत्येक घरात स्तरावर कार्यवाही झाल्यानंतर पुनश्च त्या ठिकाणी निष्काळजीपणा व दुर्लक्षामुळे डासांची निर्मिती स्थळे आढळल्यास संबंधित नागरिकांवर ही मनपा मार्फत कारवाई करण्यात येणार आहेत. यासाठी नागरिकांनी आपल्या कुटुंबाची परिसराची स्वच्छता ठेवून या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. आज दि. 12 ऑक्टोबर रोजी शहरातील विविध विभागात प्रत्यक्ष भेट देवुन परिस्थितीची पाहणी आयुक्त अजीज शेख यांनी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!