Type to search

धुळे

शेतकर्‍यांचा अंत पाहू नका, दुष्काळी पॅकेज जाहिर करा

Share

धुळे । तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनता गेल्या चार वर्षापासून दुष्काळाला तोंड देत आहे. यावर्षीही जुलै महिना संपत आला तरी अपेक्षेप्रमाणे दमदार पाऊस झाला नाही. एक-दोन तुरळक पाऊस वगळता आतापर्यंत पावसाने ओढ दिली आहे. परिणामी धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे, शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या दृष्टचक्रात सापडला आहे. शेतकर्‍यांची सहनशिलता आता संपत चालली आहे. म्हणून सरकारने शेतकर्‍यांचा जास्त अंत न पहाता धुळे तालुक्यात दुष्काळी पॅकेज जाहिर करुन सरसकट आर्थिक मदत तातडीने द्यावी, तसेच गुरांसाठी चारा छावण्या युध्दपातळीवर सुरु करण्यात याव्यात. दरम्यान शेतकर्‍यांचा खरीप हंगाम वाचविण्यासाठी धुळे तालुक्यात कृत्रिम पाऊसही पाडण्यात यावा आणि जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर शेतकर्‍यांच्या भावनाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा आ.कुणाल पाटील यांनी शासनाला दिला.

धुळे तालुक्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीसाठी दुष्काळी पॅकेज जाहिर करावे, तालुक्यात कृत्रिम पाऊस पाडावा, चारा छावण्या सुरु कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्यावतीने तालुक्यातील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांना आज सायंकाळी निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना कपाशी, मका, बाजरी, ज्वारी, भुईमुग व कडधान्याची पेरणी केली आहे. मात्र पावसाने ओढ दिल्याने पाण्याअभावी ही पिके करपू लागली आहे.त्यामुळे वाढ खुंटून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

यासाठी मशागतीपासून तर लागवडीपर्यंत आणि त्यानंतरच्या देखभालीकरीता शेतकर्‍यांनी हजारो रुपये खर्च केला आहे. तर कोरडवाहू शेतकर्‍यांनी खरीपपूर्व मशागत करुन ठेवली आहे मात्र पावसाअभावी बर्‍याच ठिकाणी पेरण्याच झाल्या नाहीत त्यामुळे आता खरीप हंगामही वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. उत्पन्न तर दुरच परंतु झालेला खर्चही निघणार नाही. त्यामुळे धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना सन 2019-20 या खरीप हंगामाकरीता सरसकट दुष्काळी अनुदान व नुकसान भरपाई देण्यात यावी.तसेच दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेज जाहिर करावे.

प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आजही धुळे तालुक्यातील शेतकरी सन 2018च्या दुष्काळी अनुदानापासून वंचित आहे. तरी सदरचे दुष्काळी अनुदान तातडीने शेतकर्‍यांना देण्याबाबत कार्यवाही करावी.

कृत्रिम पाऊस पाडणे- दुष्काळामुळे शेतकर्‍यांच्या आणि शेतमजुरांचे स्थलांतर वाढले आहे. गावे ओस पडू लागली आहे. तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. पावसाळा सुरु होवून दोन महिने होत आले मात्र अद्याप पुरेसा व दमदार पाऊस झाला नाही. शेतकर्‍यांनी लावगड केलेली खरिप पिकांची वाढ खुटूंन धोक्यात आली आहेत.तर अद्याप तालुक्यात बर्‍याच ठिकाणी पेरणीच झाली नाही, अशा निसर्गाच्या दृष्टचक्रात शेतकरी सापडला आहे. त्यामुळे आता धुळे तालुक्यातील शेतकरी वाचवायचा असेल तर कृत्रिम पावसाची सक्त गरज निर्माण झाली आहे. म्हणून धुळे तालुक्यात तातडीने कृत्रिम पाऊस पाडून शेकर्‍यांना दिलासा द्यावा.

चारा छावण्या सुरु करणे- सततच्या दुष्काळामुळे तालुक्यातील शेतकरी चाराटंचाईला सामारे जात आहे.त्यामुळे पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय धोक्यात आले आहे. चार्‍याअभावी शेतकर्‍यांना आपले उपजिविकेचे साधन असलेले जनावरेही विकावी लागत आहे. मागणी वर्षीचा चारा नव्हता आणि पुन्हा चालू खरीप हंगामात पाऊस नसल्याने चार्‍याची उगवणच झाली नाही. परिणामी धुळे तालुक्यातील पशुपालक शेतकरी भीषण चारा टंचाईला सामोरे जात आहे. त्यामुळे धुळे तालुक्यातील गावागावात चारा छावण्या सुरु करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पिक विमा रक्कम द्यावी- धुळे तालुक्यात पिक विम्याबाबत प्रचंड गोंधळ असून या गोंधळामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी वंचित राहिले असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले. धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांनी मागील खरीप हंगामात पिक विमा काढला होता. मात्र शासनाच्या दिरंगाईमुळे केवळ 25 ते 30 टक्के शेतकरी वगळता असंख्य शेतकर्‍यांना पिकविम्याची रक्कमच मिळाली नाही. हजारो रुपये खर्च करुन शेतकरी आपल्या शेतात पिक घेत असतात. मात्र गेल्या हंगामात शेतकर्‍यांना दुष्काळाला तोंड द्यावे लागले. शेतकर्‍यांनी वेळेत पिक विमा काढला,सरकारच्या अनास्थेमुळे शेतकर्‍यांना पिकविम्याची रक्कमच मिळाली नाही. तर धुळे तालुक्यातील काही महसुली मंडळात कापूस पिकाला पिक विमाच्या लाभापासून वगळण्यात आले आहे. परिणामी पात्र शेतकर्‍यांवर अन्याय झाला आहे.

म्हणून वगळण्यात आलेल्या कापूस क्षेत्रावरील शेतकर्‍यांनाही पिक विम्याचा लाभात समावेश करुन पिक विमा कंपन्यांना विम्याची रक्कम त्वरीत देण्याचे आदेश करण्यात यावेत. तसेच चालू खरीप हंगामासाठी पिका विमा भरण्यासाठी शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.त्यात फळबागायतीचा विमा भरण्याची मुदत संपुष्टात आली असल्याने धुळे तालुक्यातील असंख्य शेतकर्‍यांनी अद्याप फळबागायतीचा विमा भरलेला नाही. त्यामुळे त्या शेतकर्‍यांना विमा योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणून फळबागायतीसह इतर पिकांचा विमा भरण्याची मुदत वाढविण्यात यावी. दरम्यान पिक विम्याबाबत संबधित विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि बँक अधिकार्‍यांची स्वतंत्र बैठकच आयोजित करण्याची मागणीच आ.कुणाल पाटील यांनी यावेळी जिल्हयाधिकार्‍यांकडे केली.

यावेळी चर्चेप्रसंगी निवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड, प्रांतधिकारी भिमराज दराडे, तहसिलदार किशोर कदम, जि.प.सभापती मधुकर गर्दे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान पाटील, कृऊबाचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, पं.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील, पं.स.चे उपसभापती दिनेश भदाणे, प्रमोद जैन,कृऊबा उपसभापती रितेश पाटील,डॉ.दरबारसिंग गिरासे,अशोक सुडके, पंढरीनाथ पाटील,एन.डी.पाटील,ज्येष्ठ नेते जगन्नाथ जाधव, प्रदिप देसले,काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल,शोभा जाधव, संचालक बापू नेरकर, सरपंच देवेंद्र भामरे, पांडूरंग मोरे, सुतगिरणीच व्हा.चेअरमन युवराज चौधरी, पं.स.सदस्य दत्तात्रय वाणी, माजी पं.स.सदस्य योगेश पाटील,भोलेनाथ पाटील, सरपंच सोमनाथ पाटील, कृष्णा पाटील,अरुण पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकर्‍यांनी धीर सोडू नये
तालुक्यात आणि जिल्हयात पावसाअभावी परिस्थिती गंभीर आहे.भविष्यात दुष्काळाचे भीषणता वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही. अशा स्थिती आपल्याला सगळ्यांनी मिळवून मार्ग काढायचा आहे.त्यामुळे शेतकर्‍यांनी धीर सोडू नये, दुष्काळाच्या संकटाला धीराने सामोरे जावे, तुमच्या प्रत्येक संकटात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे.येणार्‍या काळात सरकारने जर शेतकर्‍यांना मदत दिली नाही तर तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन त्यांनी यावेळी आ. कुणाल पाटील यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!