जिल्ह्यात दोन हजार 663 क्षयरुग्ण आढळले

शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बी.बी.माळी यांची माहिती

0
धुळे । जिल्ह्यात 20 हजार 839 संशयित क्षयरुग्णांची थुंकी नमुने तपासले असता त्यापैकी दोन हजार 663 क्षयरुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बी.बी.माळी यांनी दिली आहे.

जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 दरम्यान धुळे शहरांतर्गत 4421 संशयित क्षयरुग्णांचे थुंकीचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 596 क्षयरोग रुग्ण आढळून आले आहेत. तर 308 रुग्ण उपचार होवून बरे झाले आहेत. तर 288 रुग्णांवर सध्या औषोधोपचार सुरु आहेत. तसेच डॉट्स प्लस कार्यक्रमांतर्गत 472 रुग्णांचे थुंकी नमुने संशयित एमडीआर म्हणून पुणे व धुळे प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. 472 रुग्णांपैकी 29 रुग्ण डीआर टीबी आढळून आले आहेत. सध्या या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 दरम्यान 16 हजार 418 संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 2067 रुग्ण आढळून आले आहेत. 1591 रुग्णांवर उपचार होवून ते बरे झाले आहेत. 1045 रुग्णांचे थुंकी नमुने संशयित एमडीआर म्हणून पुणे व धुळे प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. रुग्णांपैकी 33 रुग्ण डीआर टीबी आढळून आले आहेत. सध्या या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. असे डॉ. माळी यांनी सांगितले.

थोर शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक् यांनी क्षयरोग जीवाणूंचा शोध लावला म्हणून दि. 14 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त शहर क्षयरोग केंद्र, महापालिका, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद अंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 25 मार्च रोजी जागतिक क्षयरोग सप्ताहाचे सकाळी 9 वाजता उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त सुधाकर देशमुख, सीईओ डी.गंगाथरन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम.पी.सांगळे, अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे, उपायुक्त शांताराम गोसावी, डॉ. एस.व्ही.घोरपडे, डॉ. सुधाकर मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी जादूगार रुबाब हैदर हे जादूच्या प्रयोगाच्या माध्यमातून क्षयरोगाची लक्षणे, निदान पध्दती व उपचार याबाबत संदेश देणार आहेत. त्यानंतर क्षयरोगावर आधारीत विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. शहरातून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.

शासकीय नवीन योजना
प्रत्येक क्षयरुग्णाला उपचार पुर्ण होईपर्यंत प्रति महिना 500 इतके अनुदान पोषण आहारासाठी रुग्णाच्या बँक खात्यावर जमा केले जातात. खाजगी डॉक्टरांकडे रुग्णाचे निदान करुन क्षयरोग केंद्रात रुग्णाची नोंद केल्यास 500 उपचार पुर्ण झाल्याची नोंद केल्यास पुनश्च 500 रुपये देण्यात येणार आहे. महापालिके अंतर्गत 596 क्षयरुग्णांची नोंद झाली असून या सर्व रुग्णांना पोषण आहार योजनेंतर्गत दरमहा 500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहेत. तसेच शहरातील 24 खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांकडे क्षयरुग्ण निदान करुन त्यांची शासनाकडे नोंदणी केल्याने प्रत्येकी 500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
-डॉ. बी.बी.माळी,
शहर क्षयरोग अधिकारी

LEAVE A REPLY

*