Type to search

धुळे

उमेदवारांनी दहा हजारांवरील खर्च धनादेशाद्वारेच करावा- ए.आनंदकुमार

Share

धुळे । विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना प्रचारासाठी खर्च मर्यादा 28 लाख असून उमेदवारांनी दहा हजार रुपयांवरील खर्च धनादेशाद्वारेच करावयाचा आहे, असे निर्देश धुळे ग्रामीण, धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक ए. आनंदकुमार यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी., निवडणूक निर्णय अधिकारी भीमराज दराडे (धुळे ग्रामीण), डॉ.श्रीकुमार चिंचकर (धुळे शहर), खर्च विभागाचे समन्वयक अधिकारी बाबूलाल पाटील, जिल्हा कोशागार अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

खर्च निरीक्षक ए. आनंदकुमार म्हणाले, धुळे ग्रामीण व धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाचे निरीक्षण 11, 15 आणि 19 ऑक्टोबर रोजी करण्यात येईल. उमेदवारांनी खर्चाच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे. खर्च नोंदवही, बँक पासबुक, खर्चाची प्रमाणके (व्हाऊचर) यांची माहिती अद्ययावत ठेवावी. काही अडचणी असतील, तर प्रथम निवडणूक निर्णय अधिकार्‍यांशी संपर्क साधावा. उमेदवारांनी निवडणुकीसाठी उघडलेल्या बँक खात्यातूनच व्यवहार करावेत. तसेच प्रत्येक वस्तूचे बिल सादर करावे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे. तक्रारीसाठी सी- व्हिजिल हे प उपलब्ध आहे. याशिवाय 1950 या दूरध्वनी क्रमांकावरही तक्रार नोंदवू शकतात.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, उमेदवारांनी दैनंदिन खर्चाच्या नोंदी ठेवाव्यात. वेळोवेळी खर्चाची माहिती सादर करावी. सहाय्यक खर्च निरीक्षकांनी शॅडो रजिस्टर अद्ययावत ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

दैनंदिन अहवाल सादर करावेत- महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित झाले असून संबंधित विभागांनी आपले अहवाल दररोज सादर करावेत, असे निर्देश खर्च निरीक्षक ए. आनंदकुमार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात नोडल अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दराडे, डॉ.चिंचकर, खर्च विभागाचे समन्वयक श्री.पाटील उपस्थित होते. खर्च निरीक्षक श्री.आनंदकुमार म्हणाले, उमेदवारांची सभा, रॅली, रोड शोचे पथकांनी परिपूर्ण चित्रीकरण करावे. भरारी पथकांनी सतर्क रहावे. बँकांनी संशयित व्यवहारांची माहिती दररोज सादर करावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!