Type to search

धुळे

वादळातील नुकसानग्रस्तांच्या वेदना अधिवेशनात मांडणार

Share

धुळे । वादळाच्या तडाख्याने कुणाचे घर पडले तर कुणाचा संसार उद्ध्वस्त झाला.लाखो रुपये खर्च करुन पॉली हाऊस सारख्या आधुनिक शेतीचे स्वप्न मोडकळीस आले.अशावेळी उद्ध्वस्त मनांना आधार देत आ.कुणाल पाटील यांनी वादळातील नुकसानीची अधिवेशनापूर्वी पाहणी केली, नुकसानग्रस्त शेतकरी आणि उद्योजकांना भरपाई मिळावी म्हणून सुरु असलेल्या अधिवेशनात धुळे तालुक्यात अचानक आलेल्या वादळातील नुकसानग्रस्तांच्या वेदना पटलावर मांडणार असल्याचे आश्वासन आ.कुणाल पाटील यांनी दिले, दरम्यान आ.कुणाल पाटील यांनी वादळाच्या दुसर्‍या दिवशी तातडीने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून नुकसान भरपाईची मागणी केली होती.

धुळे तालुक्यात दि.11 जून रोजी सायंकाळी 4.30 वाजता अचानक वादळी पाऊस झाला. सोसाट्याच्या वादळामुळे धुळे तालुक्यातील शेतकरी आणि अवधान एमआयडीसीतील उद्योजक, धुळे शहरातील पॉवललूम यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुंबईत सुरु झालेल्या अधिवेशनापूर्वी आ.कुणाल पाटील यांनी नुकतीच नुकसानीची पहाणी केली.आ.पाटील यांनी शिरुड,विंचूर, बोरकुंड, रतनपुरा, चांदे, मोरदड तांडा, मोरदड या गावातील शेतकर्‍यांचे व ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. प्रत्येक गावात जाऊन तब्बल सात तास आ.पाटील यांनी पाहणी केली. धुळे तालुक्यातील शिरुड, तिखी, गोंदूर येथे लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले शेतकर्‍यांचे पॉली हाऊस कोसळले, शेडनेटचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.विंचूर येथील सुभाष बोरसे यांच्या गायींवर पत्रे उडाल्याने त्या जखमी झाल्या तर योगेश संपत बोरसे यांचे पोल्ट्रीफार्म कोसळले आहे. त्यामुळे त्यात काही कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. दिलीप तुळशिराम बोरसे, किशोर प्रल्हाद बोरसे यांचेही नुकसान झाले आहे. तर चांदे आणि मोरदड तांडा, मोरदड येथेही घराची पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेक ठिकाणी केळी, डाळींब, लिंबू, आंबा या फळपिकांचेही नुकसान झाले आहे. शेतातील गोठ्याचे पत्रे उडाली तर कांदा चाळींवरील पत्रे उडाल्याने चाळीसह कांद्याचेही नुकसान झाले आहे. वादळामुळे जनावरे जखमी झाले तर पोल्ट्रीफार्म कोसळल्याने शेकडो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या.शिरुड, विंचूर, बोरकुंड परिसरात विजेचे खांब उन्मळून पडले तर काही ठिकाणी वाकून गेले आहेत त्यामुळ विद्युत तारा तुटल्याने शेतकर्‍यांच्या शेतातील विज पुरवठा खंडीत झाला . सदर विज पुरवठा तत्काळ सुरु करण्याच्या सूचना आ.कुणाल पाटील यांनी सोबत असलेल्या वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अजय पवार यांना दिल्या.

तरुण शेतकर्‍याचे स्वप्न भंगले-
बोरकुंड ता.धुळे येथील तरुण शेतकरी राजेंद्र भालचंद्र भदाणे यांनी पाहिलेले आधुनिक शेतीचे स्वप्न अर्धावरच भंगले, स्वतः बीएस्सी अ‍ॅग्रीचे शिक्षण घेवून नोकरी न करता आपल्या गावातच आधुनिक पध्दतीने शेती करण्याची खुणगाठ बांधली.आपल्या शेतात पॉली हाऊस उभे करण्याचे निश्चित झाले.कर्जासाठी बँकाच्या चकरा मारल्या पण लालफीतीच्या कारभारात पॉलीहाऊससाठी कर्ज मंजुर झाले नाही मग अखेर राजेंद्र भदाणे यांनी स्वतः पदरमोड करुन लाखो रुपये खर्चातून पॉलीहाऊस उभे केले.एक-दोन पिक घेण्यास सुरुवातही केली मात्र अचानक आलेल्या वादळामुळे पॉली हाऊसचे प्रचंड नुकसान झाले,पूर्णपणे जमिनीवर कोसळले आणि आधुनिक शेतीचे स्वप्न वादळातच उडून गेले. राजेंद्र भदाणे यांनी स्वखर्चातून उभारलेल्या पॉलीहाऊसला विमा संरक्षण देवून शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले.

धुळे शहरातील अवधान एमआयडीसीतील तब्बल 40 पेक्षाही अधिक औद्यागिक कंपन्यांचे व तेथील उत्पादनाचे असे एकूण सुमारे 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. एकंदरीत वादळाचा धुळ्याच्या औद्यागिक क्षेत्रावर मोठा प्रभाव झाला असून नुकसान झालेल्या उद्योजकांनाही 100 टक्के भरपाई देण्यात यावी अशी मागणी अधिवेनशनात करणार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.दरम्यान आ.कुणाल पाटील यांनी वादळाच्या दुसर्‍या दिवशी तातडीने जिल्हाधिकार्‍यां भेट घेवून वेगाने पंचनामा करुन 100 टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.

आ.कुणाल पाटील यांच्यासोबत जि.प.सभापती मधुकर गर्दे, कृऊबाचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, पं.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील, भगवान गर्दे, काँग्रेस सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अजय पवार, पं.स.च्या गटविकास अधिकारी सौ.सुवर्णा पवार, पशुवैद्यकिय अधिकारी डी.के.पाटील, मंडळाधिकारी कनके, मंडळ कृषी अधिकारी महेंद्र वारुडे, गटविस्तार अधिकारी व्ही.बी. गर्दे, विंचुर येथील सुभाष बोरसे, बापू भदाणे, बाबा माळी, नारायण देवरे, बळीराम राठोड, हिंमत बाचकर उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!