Type to search

धुळे नंदुरबार

धुळे, नंदुरबारात ‘मृगा’चा वादळी तडाखा

Share

धुळ्यात वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी
धुळे । शहरासह परीसरात आज सायंकाळी वरुण राजाने वादळी वार्‍यासह जोरदार हजेरी लावेली. अर्धा तास झालेल्या पावसाने सर्वांचीच धावपळ उडाली होती. मान्सूनचा पहिलाच पाऊस असल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला. वादळी वार्‍यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडली. घराची पत्रे ही उडाली. वीज ताराही तुटल्या. त्यामुळे संपूर्ण शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता त्यामुळे नागरिकांनी उकाड्यापासून काहीशी सुटका झाली. शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभरात अनेकवेळा पावसाचे वातावरण होते, अखेर सायंकाळी साडे चार वाजता वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली.

वीजेच्या कडकडाटांसह साधारण
अर्धा तास पाऊस झाला. वादळी वार्‍याने उडालेल्या धुळीमुळे रस्त्यावरील समोर असलेली व्यक्तीही दिसणे मुश्किल झाले होते. वादळामुळे एमआयडीसी, ऐंशीफुटीरोड, कृषी उत्पन्न बाजार समिती परीसर, साक्रीरोड, देवपूर, जुने धुळेसह ग्रामीण भागात घरावरील छताचे पत्रेही मोठ्या प्रमाणात उडाल्याने नुकसान झाले. वारा जोरदार असल्याने मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सीसमोर दिशादर्शक फलकाचा खांब पडल्याने हा फलक महामार्गावर पडला अनेक हॉटेल्सचे देखील पत्रे उडून नुकसान झाले. एमआयडीसी परिसरातील काही कंपन्यांचे देखील पत्रे उडून व कंपाऊंड पडून नुकसान झाले. वादळी पाऊसामुळे झाडांची पडझड झाली. अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटून पडल्या तर काही ठिकाणी खांब वाकले होते. पावसामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.तिखी, सावळदे, शिरुड शिवारात पॉली हाऊसचे नुकसान झाले आहे.

धुळे शहरासह तालुक्यात वादळी वार्‍यासह पाऊस झाला त्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील शेडनेटचे नुकसान झाले आहे. त्यात शहरातील नरेंद्र कुलकर्णी यांचे सावळदे व तिखी शिवारातील पॉली हाऊसमधील डच गुलाबसह वार्‍यामुळे पॉली हाऊसचे मोठे नुकसान झाले आहे. शिरुर येथेही वादळी वार्‍यामुळे शेतकरी नितीन रंगराव कोतेकर त्यांच्या शेडनेटचे नुकसान झाले आहे. साक्री शहरासह पिंपळनेर परिसरातही साधारण पाऊस झाला.

पाच ते सहा तास वीजपुरवठा खंडित
धुळे शहरासह परिसरात साडेचार ते साडेपाच वाजेदरम्यान वादळी वार्‍यासह पाऊस झाला. त्यामुळे वृक्ष उन्मळून पडले, वृक्षाच्या फांद्या तुटल्या. वीज वाहिनी तुटल्याने संपूर्ण शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. शहरातील निम्म्यापेक्षा अधिक भागातील वीजपुरवठा रात्री नऊ वाजेपर्यंत वीज सुरळीत झालेला नव्हता.

नंदुरबारात वादळीवार्‍यासह जोरदार पाऊस
नंदुरबार । शहरासह जिल्हयात विजांच्या कडकडाट तसेच वादळी वार्‍यासह तुफान पावसाने हजेरी लावली. वादळी वार्‍यामुळे जिल्हाभरात अनेक ठिकाणी घरांची छपरे उडाली असून वृक्ष उन्मळून पडले आहे. मात्र, या पावसामुळे गेल्या दोन महिन्यापासून रणरणत्या उन्हाच्या सामना करणार्‍या नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वार्‍यासह पावसाने सलामी दिली. आज दुपारी 3 वाजेपासूनच वातावरणात बदल झाला होता. सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तसेच दमटपणादेखील वाढून उष्मा जाणवत होता. त्यामुळे आज पाऊस नक्कीच येईल, अशी अपेक्षा होती. दरम्यान, 5 वाजेच्या सुमारास शहरासह जिल्हाभरात तुफान वादळाला सुरुवात झाली. सोसाटयाचा वारा सर्वत्र वाहत असल्यामुळे अनेक घरांचे छपरे उडाले, अनेक झोपडया जमिनदोस्त झाल्या तसेच वृक्ष उन्मळून पडले. वीजांच्या तारा तुटल्या. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुमारे अर्धा तास वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरु होता. वीजांचा तांडव रात्री उशिरापर्यंत सुरु होता.

आज मंगळवार असल्याने बाजाराचा दिवस होता.अचानक आलेल्या पावसामुळे मंगळ बाजरात एकच धावपळ उडाली. शहरासह 15 ते 20 मिनीटे पावसाच्या सरी कोसळल्या. उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांनी पावसाचा आनंद घेत बच्चे कंपनीसह पावसात शहरातुन फेरफटका मारला. जिल्हाधिकारी रस्त्यावर असलेल्या तलावपाडा येथील 5 ते सहा घरांचे पत्रे उडाले, एका घरावर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. नंदुरबार शहरातील योगेश मधुकर चौधरी या मुर्तीकाराचे सुमारे 10 हजार स्क्वेअर फुट आकाराचे शेड उडाले. तसेच गणपतींच्या मुर्त्यांचे नुकसान झाले आहे. शहरातील मोठा मारुती मंदिर टेकडीवरील रहिवासी कलाबाई चंद्रकांत नाथजोगी यांच्या घराचे पत्रे वादळामुळे उडून गेले. त्यामुळे नुकसान झाले आहे.

तळोदा येथेही सायकांळी साडे सहाच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या दिवसभरापासुन उकाडयाने हैराण झालेल्या नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला. तळोदा शहरासह परीसरात 15 मिनीटांपर्यत पाऊस पडला. नवापूर, अक्कलकुवा धडगांव येथेही पावसाने तुरळक हजरी लावली. शहादा शहरात विजांचा कडकडातासह वार्‍याने हजेरी लावली मात्र पावसाने रात्रीपर्यंत हुलकावणी दिली. दरम्यान, धडगाव येथे सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास वादळी वारा तसेच वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!