Type to search

धुळे

वादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक

Share

धुळे । धुळे तालुक्यात झालेल्या वादळामुळे शेतकरी आणि उद्योजकांचे प्रचंड नुकसान झाले असतांना अद्यापही सरकारकडून कोणतीही मदत त्यांना देण्यात आली नाही. म्हणून शेतकरी आणि उद्योजकांबद्दल सरकार उदासिन असून सरकारला त्यांची चिंता नाही का? असा खडा सवाल उपस्थित करून आ.कुणाल पाटील यांनी आज विधानसभेत वादळग्रस्तांसाठी आक्रमकपणे भुमिका मांडली. नुकसान भरपाई मिळावी म्हणून आ.कुणाल पाटील यांनी धुळे तालुका आणि शहरातील वादळग्रस्त शेतकरी आणि उद्योजकांचा आवाज विधानसभेत उठविला.

दरम्यान, आ.कुणाल पाटील यांचा विधानसभेतील आक्रमक पवित्रा पाहून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकसानीची माहिती जाणून घेतली व वादळामुळे खंडीत झालेला विजपुरवठा तातडीने सुरु करण्याचे आदेश ऊर्जा सचिवांना दिले.

मुंबईत महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आज दि.19 जून रोजी आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत धुळे तालुक्यात आणि जिल्हयात वादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत आक्रमपणे औचित्याच्या मुद्दा मांडला. यावेळी धुळे तालुक्यात आणि शहरात वादळामुळे झालेल्या नुकसानीची विधानसभेत माहिती देतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, दि.11 जून रोजी धुळे तालुक्यात आणि शहरात सायंकाळी 4.30 वाजता वादळी पावसाने हजेरी लावली. वादळाच्या प्रचंड तडाख्याने प्रामुख्याने धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले. काही गावांमध्ये रहिवाशी घरांचीही छत उडाल्याने मोठी पडझड झाली आहे. तर धुळे येथील अवधान एमआयडीसीमधील उद्योगालाही त्याचा मोठ फटका बसला आहे. या तडाख्यात छोटे छोटे व्यावसायिक यांचेही मोठे नुकसान झाले आहे.आधीच दुष्काळाने कर्जबाजारी असलेल्या शेतकर्‍यांवर अचानक आलेल्या वादळामुळे फार मोठी नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. प्रचंड वादळाच्या तडाख्याने धुळे तालुक्यात फळबागायत उद्ध्वस्त झाली आहे. शिरुड, कुसूंबा, गोंदूर, परिसरात डाळींब, केळी, लिंबू, आंब्यांची झाडे उन्मळून पडली.त्यावरील फळे वादळाने अवेळी पडून उत्पादनाचेही नुकसान झाले. शेतकर्‍यांनी उभे केलेले पॉलीहाऊस, शेडनेट, पोल्ट्रीफार्म, कांदाचाळी कोसळल्या. वैयक्तीक आणि खाजगी कर्जाने उभ्या केलेल्या पॉलीहाऊस आणि शेडनेटला विमा संरक्षण शासन देत नाही. त्यामुळे तब्बल 25 ते 50 लक्ष रुपये खर्च करुन उभे केलेले पॉलीहाऊस व शेडनेटला विमा सरंक्षण देण्याची मागणी आ.पाटील यांनी केली. वादळामुळे गावातील व शेतातील रहिवाशी घरांची पत्रे उडाल, पावसामुळे भिंती,झोपड्याही कोसळल्या. त्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचेही नुकसान झाल्याने संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे अशा नुकसानग्रस्तांना तातडीने मदत जाहिर करावी व ती त्यांना तत्काळ वितरीत करावी. असे आ. पाटील यांनी सांगितले.

वादळामुळे उडालेली पत्रे, झाडे कोसळून, शेड,गोठे कोसळून काही गाई, म्हशी, बैल जखमी झाले आहेत. काही ठिकाणी मृत पावले आहेत. पोल्ट्रीफार्म कोळल्याने शेकडो कोंबड्या मृत्यमुखी पडल्या आहेत. परिणामी शेतकर्‍यांचे झालेले लाखो रुपयांचे नुकसान तातडीने देण्याची गरज आहे. वादळी पावसामुळे धुळे तालुक्यातील शेतकर्‍यावर दुष्काळानंतरीची ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती असून शासनाने आपले कर्तव्य समजुन शेतकर्‍यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी विधानसभेत आ.कुणाल पाटील यांनी केली.

पाणीटंचाईत वाढ
धुळे तालुक्यात भीषण दुष्काळ असल्याने सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात जवळपास 22 गावांना पाण्याचे टँकर सुरु आहेत. मात्र वादळामुळे विद्युत खांब कोसळून विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा गेल्या आठ दिवासापासून खंडीत झाला आहे. त्यामुळे हे टँकर विजेअभावी भरले जात नाही.परिणामी वादळामुळ तीव्र पाणी टंचाईत भर पडली आहे. म्हणून वीजपुरवठा तातडीने सुरु करण्याचीही मागणी आ.पाटील यांनी केली.

एमआयडीसीलाही फटका
धुळे अवधान एमआयडीसीतील तब्बल 40 पेक्षाही अधिक औद्यागिक कंपन्यांचे व तेथील उत्पादनाचे असे एकूण सुमारे पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.एकंदरीत वादळाचा धुळ्याच्या औद्यागिक क्षेत्रावर मोठा प्रभाव झाला असून नुकसान झालेल्या उद्योजकांना शंभर टक्के भरपाई देण्याची मागणीही आ.पाटील यांनी विधानसभेत केली आहे.

ऊर्जामंत्र्यांनी बोलविली तातडीने बैठक
औचित्याचा मुद्दा मांडत असतांना आ.कुणाल पाटील यांचा आक्रमक पवित्रा पाहून विधानसभा अध्यक्षांना दखल घ्यावी लागली आणि ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या दालनात आ.कुणाल पाटील यांच्या उपस्थित धुळे तालुका,शहर आणि जिल्हयातील वीज वितरणाबाबत तातडीने बैठक बोलविली. बैठकीत आ.कुणाल पाटील यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.त्यात त्यांनी सांगितले की, वादळामुळे वीज वितरण कंपनीचे विद्युत खांब कोसळले, तारही वाकून गेल्यामुळे जिल्हयात साधारणपणे 40 कि.मी.वीजतारा तुटल्या आहेत. तसेच जिल्हयातील 20 ते 30 ट्रॉन्सफार्मरचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह धुळे तालुक्यातील विज पुरवठा खंडीत झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शासनाने तत्काळ योग्य ती साधनसामुग्री पुरवावी अशी मागणी आ.पाटील यांनी केली.त्यावर तातडीने दखल घेत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांनी सचिवांना दिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!