Type to search

maharashtra धुळे मुख्य बातम्या

मूर्तीला धक्का लागला तर प्राण त्याग!

Share
धुळे । पांझरेतील भगवान शंकराची मूर्ती ही धुळेकरांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. मनपा आयुक्तांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. आपला मान राखण्यासाठी मूर्ती खाली उतरावयाला लावणारे आयुक्तांच्या दृष्टीने धुळेकर जनतेच्या मानबिंदूला काही किंमत आहे की नाही? हा प्रश्न स्वत:ला विचारावा असे अवाहन धुळेकरांना आ.अनिल गोटे यांनी केले आहे. भगवान शंकराची मूर्ती ही धुळेकरांच्या श्रध्दा आणि सन्मानाचे प्रतिक असून या मूर्तीला धक्काही लागला तर मी माझे प्राणत्याग करेन. मूर्ती काढलीच तर ती माझ्या प्रेतावरूनच काढावी लागेल असा गंभीर इशारा आ.गोटे यांनी प्रशासनाला दिला आहे. प्रसिध्दीस दिलेल्या या पत्रकात त्यांनी मनपा आयुक्तांना टार्गेट केले आहे.

मी जे बोलतो ते नक्की करतो असे स्पष्ट करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सर्व परवानग्या घेतलेल्या असतांना देखील भाजपच्या पदाधिकार्‍याने विरोध केला. तेव्हा पासून चौपाटी नष्ट करेपर्यंत व आता मूर्तीलाही तोच विरोध करीत असल्याचे श्री.गोटे यांनी म्हटले आहे. तीन आठवड्यापासून हा वाद सुरू असतांना डॉ.भामरे यांनी, ‘मी हिंदू आहे, माझा मूर्तीला विरोध नाही.’ असा आता खुलासा केला आहे. रस्त्ता वाहतूकीला अडथळे ठरणारे कालीकामाता व पंचमुखी हनुमान मंदिर हटवू नये, यासाठी डॉ.भामरे शहरातील एक मोठे शिष्टमंडळ घेऊन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह मुख्यमंत्र्यांना भेटले. मग रस्त्याला कुठलाही अडथळा न ठरणार्‍या व शहराच्या सौंदर्यात तसेच जागतिक पातळीवर ज्याची नोंद घेतली जाईल, अशा शंकराच्या मूर्तीच्या रक्षणासाठी मुख्यमंत्र्यांकडे जायला त्यांना लाज वाटायचे काय कारण? आपला प्रामाणिकपणा सिध्द करण्याकरिता डॉ.भामरे त्यांच्या लाडक्या व प्रिय कार्यकर्त्यांना घेऊन धुळेकर जनतेच्या सन्मानासाठी मुख्यमंत्र्याकडे का जात नाहीत? असा सवाल अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.

जर मूर्तीला हात लावाल, तर तुमचे हश्र काय होईल, याचा हिशोब आताच मांडून ठेवा, उगाचच मला वाकड्यात जायला लावू नका. असा इशारा प्रशासकीय अधिकार्‍यांना देवून धुळे मनपाचवे आयुक्तांचा ऐकेरी उल्लेख करत त्यांनी न्यायालयात कालिका मंदिर रस्त्यावर नाही, एवढेच नव्हेतर तेथे रस्ताच नाही, असे खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा काय परिणाम होतो. न्यायालयाचा अवमान कशाला म्हणतात? हे आता या आयुक्तांना दाखवून देण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचा गर्भित इशाराही अनिल गोटे यांनी पत्रकात शेवटी दिला आहे.

मूर्तीला नव्हे, गोटेंच्या खोटारडेपणाला विरोध!
महादेवाच्या मूर्तीला नव्हेतर अनिल गोटेंच्या खोटारडेपणाला आपला विरोध असल्याचे पत्रक भाजपाचे नगरसेवक हिरामण गवळी यांनी प्रसिध्दीला दिले आहे. पुलावर मूर्ती बसविण्याची परवानगी आहे का? मूर्ती 23 फुट उंच व 18 टन वजनाची असेल असे श्री.गोटेंनी जाहीर केले होते. या मूर्तीचे वजन फक्त 9 ते 10 टन ऐवढेच असल्याची आपली खात्री असून वजन करून घेण्याबाबत मी पहिल्यापासूनच आग्रही असल्याचे श्री.गवळी यांनी म्हटले आहे. अनिल गोटे यांनी या मूर्तीतही लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा दावा श्री.गवळी यांनी केला आहे. रात्रीच्या अंधारात मंदिरे तोडतांना तुमचा धर्म कुठे गेला होता? असा उपरोधिक सवालही हिरामण गवळी यांनी श्री.गोटे यांना केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!