9 ऑगस्टला मराठा क्रांती : मुंबईत ‘एक मराठा -कोटी मराठा’चा गजर

0
धुळे । दि.4 । प्रतिनिधी-कोपर्डी घटनेप्रकरणी कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर देखील सरकारने दखल घेतली नाही.
त्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी दि.9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यभरातून सुमारे एक कोटीपेक्षा अधिक मराठा समाज बांधव सहभागी होणार असून धुळे जिल्ह्यातून एक लाख मराठा समाज बांधवांचा सहभाग या मोर्चात राहणार आहे.

23 जुलै 2016 रोजी कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेला वर्ष पूर्ण झाले.

मात्र पिडीतेला अद्याप न्याय मिळालेला नाही. संशयित आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याची पूर्तता केली नाही.

कोपर्डी घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा त्याचप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, शेतीमालास हमीभाव देण्यात यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अ‍ॅट्रासिटी कायद्यात बदल करण्यात यावा. अशा विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षभरात मराठा समाजाने राज्यात एकूण 56 मोर्चे काढले होते.

धुळे शहरात निघालेल्या मोर्चात सुमारे 14 लाख समाज बांधव सहभागी झाले होते. आता मुंबईत राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात येत असून 9 ऑगस्टला निघणार्‍या या मोर्चात एक कोटीपेक्षा अधिक समाज बांधव सहभागी होणार आहेत.

यात जिल्ह्यातून एक लाख समाजबांधव आपला सहभाग नोंदविणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जनजागृतीसाठी बैठका
या मोर्चाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात विविध तालुक्यामध्ये बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी कोपरा सभा, प्रचार सभा आयोजित केल्या जात असून समाज बांधवांना मोर्चाबाबत माहिती दिली जात आहे. मोर्चात सहभागी होणार्‍या समाज बांधवांची गैरसोय होवू नये, यासाठी मुंबई नियोजन समितीने प्रत्येक जिल्ह्यासाठी संपर्क क्रमांक दिले आहेत. दरम्यान या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होवून ऐतिहासिक मोर्चाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन माजी आ.राजवर्धन कदमबांडे, धुळे कअषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुभाष देवरे, मनोज मोरे आदिंनी केले आहे.

पंचमंडळाची आज धुळ्यात बैठक
मुंबई येथे निघणार्‍या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात दि.5 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता ग.नं.5 मधील मराठा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पदाधिकार्‍यांसह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठा पंचमंडळातर्फे करण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवारी रॅली
दि.9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभुमिवर वातावरण निर्मितीसाठी व सहभागाबाबत आवाहन करण्यासाठी धुळे शहरात दि.6 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10 वाजता मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. नगावबारी जवळील ओव्हर ब्रिज श्रीकृष्ण मंदिरापासून आग्रारोडने मनोहर चित्र मंदिरासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शासकीय दूध डेअरी, चितोडरोड नाका, फाशी पूल मार्गे शिवतिर्थाजवळ संतोषी माता मंदीरजवळ याप्रमाणे रॅलीचा मार्ग राहणार आहे. हजारोच्या संख्येने युवक युवतींनी व समाज बांधवांनी मोटार सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठा मोर्चासाठी साक्री तालुक्यात बैठका

येत्या 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चात तालुक्यातून अधिकाधिक संख्येने समाजबांधव सहभागी व्हावेत यासाठी साक्री तालुका मराठा क्रांती मोर्चा कोअर कमिटी सदस्यांची नियोजन बैठक विश्रामगृह येथे घेण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चा तालुका कोअर कमिटीच्यावतीने तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठक घेत मोर्चामध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी होण्यासाठी समाजबांधवाना आवाहन केले जात आहे.

सदर बैठका म्हसदी, छडवेल कोर्डे, कासारे, दहिवेल, पिंपळनेर, या गावांमध्ये घेण्यात यत आहेत. सदर ठिकाणच्या बैठकांमध्ये परिसरातील गावातील समाजबांधवांनी देखील सहभागी व्हायचे आहे.

तसेच तालुक्यातील सर्व समाजबांधवांची येत्या रविवारी 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता येथील राजे लॉन्स मंगल कार्यालयात नियोजन बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

याच दिवशी सकाळी तालुकाभरातून मोटरसायकल रॅली काढत बैठकस्थळी रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. सदर बैठकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

साक्री तालुका मराठा क्रांती मोर्चा कोअर कमिटीच्या बैठकीत श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज सातार्‍याचे खासदार छत्रपती उदययनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मोर्चाचे व पर्यायाने सकल मराठा समाजाचे नेतृत्व करावे असा ठराव करण्यात आला. या ठरावास सर्वांनी अनुमोदन देत ठराव एकमुखाने संमत करण्यात आला.

 

 

LEAVE A REPLY

*