मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला अंतिम मान्यता

0

धुळे । मनमाड-इंदूर रेलवेमार्गाबाबत अनेक महत्वपुर्ण विषयांवर चर्चा होऊन या मार्गाच्या सहा हजार कोटी रूपयांच्या खर्चाला आज दिल्लीत झालेल्या बैठकीत अंतिम मान्यता देण्यात आली.

सदर तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीला रस्ते वाहतूकमंत्री ना. नितीन गडकरी, रेल्वेमंत्री ना. पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन आणि आ. अनिल गोटे उपस्थित होते.

आज दि. 14 रोजी सायंकाळी 5.30 वाजता ना. नितीन गडकरी यांच्या दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवन कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

ना.गडकरी यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश व रेल्वे मंत्रालयाची रेल्वे प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याची आर्थिक क्षमता नसल्याचे यावेळी मान्य केले.

इंडियन पोर्ट अ‍ॅण्ड रेल्वेज कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या ना.नितीन गडकरी यांच्याकडे असलेल्या खात्याने रेल्वेमार्गाचा सर्व म्हणजे सहा हजार कोटींचा खर्च उचलण्याचा निर्णय यावेळी ना.गडकरींनी जाहीर केला.

बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे शासकीय जागा महाराष्ट्र व मध्यप्रदेश मोफत या कॉर्पोरेशनकडे सोपविणार आहे.
रेल्वेमार्ग भरावासाठी लागणारी दगड, माती, मुरुम, वाळू इत्यादी गौण खनिजांवर एक रुपयासुध्दा रॉयल्टी लागणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्यप्रदेशच्या मुख्य सचिवांनी बैठकीत मान्य केले.

या रेल्वेमार्गासाठी लागणारा निधी परदेशी कंपनीकडून सव्वा दोन टक्के इतक्या कमी दराने मिळणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.हा सर्व रेल्वेमार्ग मनमाडपासून इंदूरपर्यंत इलेक्ट्रीकफाईड असेल तसेच कल्याण ते कसारा व कसारा ते इगतपुरी या तिसर्‍या रेल्वेमार्गाचे काम सुरु आहे.

इगतपुरी ते मनमाड या राहिलेल्या भागात सुध्दा रेल्वेच्या तिसर्‍या मार्गाचे काम आम्ही करु. तसेच कल्याण ते मनमाड ही रेल्वेची तिसरी लाईन मनमाड ते इंदूर रेल्वेमार्ग पूर्ण होण्यापूर्वी आम्ही करुन देवू, असे रेल्वेमंत्री ना.पियुष गोयल यांनी याप्रसंगी स्पष्ट करून बैठकीतच अधिकार्‍यांना यासंदभातले तत्काळ आदेश दिले.

मनमाड- मालेगाव- धुळे-नरडाणा-शिरपूर-सेंधवा-धामणोद-महू-इंदूर असा 354 किलोमिटरचा हा रेल्वेमार्ग राहणार आहे.
सदर रेल्वेमार्गाची मालकी कॉर्पोरेशनकडे 35-40 वर्षासाठी असेल. याबदल्यात कॉर्पोरेशन चार प्रवासी गाड्यांना रेल्वेमार्गाचा वापर मोफत करावयास देणार आहे.

आ.गोटेंच्या आंदोलनाचे मोठे यश


गेल्या 112 वर्षांपासून या रेल्वेमार्गाचा विषय चर्चेत आहे. तर 1989 सालापासून या रेल्वेमार्गासाठी आ.अनिल गोटे प्रयत्नशिल होते. याकामी त्यांना कै.गोपीनाथ मुंडे, कै.विलासराव देशमुख, ना.नितीन गडकरी, राम जेठमलानी व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रचंड मदत केली. 12 डिसेंबर 2007 रोजी झालेल्या रेल्वेमार्गाच्या आंदोलनाच्या केसेस अजूनही आ.अनिल गोटे व त्यांच्या कार्यकर्त्यांवर सुरु आहेत.

मी कबुल केले होते, पुर्ण केले- गडकरी


‘मी तुम्हाला कबुल केले होते, आपले सरकार आल्यानंतर मी तुम्हाला रेल्वेमार्ग करुन देईन, असे मी तुम्हाला कबुल केले होते. ते आज मी पूर्ण केले आहे. आता हा विषय आज संपला असून पुन्हा तुम्ही रेल्वेमार्गासाठी माझ्याकडे येण्याची आवश्यकता राहीलेली नाही. असे ना. नितीन गडकरी यांनी आ. अनिल गोटेंना यावेळी सांगीतले. तर ‘आता तयारीला लागा,’ असे मुख्यमंत्र्यांनी आ.अनिल गोटे यांना यावेळी म्हणाले.

भाजपा व लोकसंग्रामतर्फे जल्लोष


मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला आज अंतिम मंजूरी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत देण्यात आली. हे वृत्त धुळ्यात समजताच भाजपा व लोकसंग्राम पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी चौकात जल्लोष केला. फटाके फोडून रेल्वेमार्गाचा आनंदोत्सव साजरा केला.

LEAVE A REPLY

*