धुळ्यात 28 उमेदवार रिंगणात

1940 मतदान केेंद्र, 19 लाख मतदार संख्या निश्चित

0
धुळे । धुळे लोकसभा मतदार संघात आज माघारीअंती 28 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे आता दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. मतदार संघात 1 हजार 940 मतदान केंद्र असून त्यापैकी 88 मतदार केंद्र संवेदनशील आहेत. 9 तारखेपर्यंत नावनोंदणीनंतर आता 19 लाख 4 हजार 859 मतदार संख्या निश्चित झाली असल्याची माहिती आहे. तसेच उमेदवारांना निवडणुक चिन्हांचेही वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणुक अधिकारी प्रमोद भामरे उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सांगितले की, आज माघारीअंती 28 उमेदवार निवडणुकी रिंगणात आहेत. त्यांना चिन्हाचेही वाटप करण्यात आले आहे. मतदार संघात एकुण 1 हजार 940 मतदार केंद्र आहेत. त्यात सर्वाधिक धुळे ग्रामीणमध्ये 373 तर सर्वात कमी बागलाणमध्ये 284 मतदान केंद्र आहेत. तसेच 88 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. त्यात सर्वाधिक मालेगाव मध्ये मध्ये 57 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. संवेदनशिल मतदान केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात येणार आहे. तसेच तेथे व्हीडीओ शुटींग देखील करण्यात येणार आहे.

मतदार संघात एकुण 19 लाख 4 हजार 859 मतदार संख्या निश्चित झाली आहे. त्यात 9 लाख 93 हजार 903 पुरूष मतदार, 9 लाख 10 हजार 935 महिला व 21 तृतीय पंथी मतदार आहेत.

मतदान केंद्रावर एकुण 8 हजार 800 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले आहेत. तसेच दुसरे प्रशिक्षण सत्र 20 व 21 एप्रिल रोजी होणार आहे. म तसेच मुख्य निरीक्षकम्हणून मुख्य निवडणुक निरीक्षक अलखकुमार सहारीया, खर्च निरीक्षक पी विजयकुमार व पोलिस विभागाचे निवडणूक निरीक्षक म्हणून शेखरकुमार यांची नियुक्त करण्यात आली असल्याचेही श्री. रेखावार यांनी सांगितले.

दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच त्यांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच 14 ते 17 वर्षे वयोगटातील 3200 स्वयंसेवकांची मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सांगितले.

यांनी घेतली माघार
लोकसभा निवडणुकीसाठी 36 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यात छाननीअंती 32 जणांचे 41 अर्ज वैध ठरले होते. त्यात आज दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची मुदत होती. त्यात काल डॉ. सुभाष भामरे यांचे पुत्र राहुल भामरे यांनी माघात घेतली तर आज ताहीर बेग समरबेग मिर्झा, अब्दूल रशीद शेख महेमुद व दाजी एकजाद मोबीन खान यांनी माघार घेतली आहे.

आ.गोटे यांना ‘फुगा’
आ. अनिल गोटे यांनी लोकसंग्राम संघटनेकडून उमेदवारी केली असून त्यांनी शिट्टी, या चिन्हाची मागणी निवडणुक यंत्रणेकडून केली होती. मात्र अपक्ष उमेदवाराने शिट्टी हे चिन्ह मागिल्याने त्या उमेदवाराला ते देण्यात आले. चिन्ह वाटप प्रक्रीयेदरम्यान आ. अनिल गोटे स्वतःअथवा प्रतिनिधी उपस्थित नव्हता. उशिराने आ.गोटे दाखल झाले असता त्यांना सफरचंद हे चिन्ह देण्यात आले. मात्र आपल्याला चिन्ह बदलून मिळावे, अशी मागणी आ. गोटे यांनी यावेळी केली. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आ. गोटे यांनी केलेल्या अर्जाची माहिती निवडणुक आयोगाला दिली असून आयोगाच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सांगितले. त्यानंतर आ. गोटे यांना आता बदलून ‘फुगा’ हे चिन्ह देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*