अभय महिला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन : आनंदी राहण्यासाठी खेळ आवश्यक : प्रा.ए.ए.पाटील

0

धुळे : ६४ कलाप्रकारापैकी खेळ हा महत्वाचा क्रीडा प्रकार आहे. स्पर्धेतील खेळाडूने खेळ खेळतांना समोरच्या संघाच्या कच्चा दुव्याचा अभ्यास करून जर खेळ केला तर विजय आपलाच असतो. क्रीडा स्पर्धेत ध्येय व उद्दिष्ट हे महत्वाचे असते. खेळामुळे शरीर फिट राहते व शरीर फिट राहिले तर मनही फिट राहते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंदी राहण्यासाठी खेळ खेळावा. खेळामध्ये वेळेचे व्यवस्थापन महत्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनीनी कोणत्यातरी एका खेळात सहभाग घ्यावा असे प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभागप्रमुख प्रा.ए.ए.पाटील यांनी सांगितले.

येथील अभय युवा कल्याण केंद्र संचलित कला महिला महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०१८ रोजी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची शतकोत्तर ११३ वी जयंती राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरी करण्यात आली. त्यानिमित्त जिमखाना विभागामार्फत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए.माळी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. जी.बी. चौधरी उपस्थित होते.

कार्यक्रमाला  व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. विनोद एल. पाटील व जिमखाना समिती समन्वयक प्रा. जी.जी.धनगर उपस्थित होते. सुरुवातीस मेजर ध्यानचंद यांचा प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए.माळी यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर  व्याख्याते, प्रमुख पाहुणे यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत गीत कु. कोमल पाटील व पूजा कोळी यांनी म्हटले. तर मनोगतात कु. सुजाता वाणी हिने ध्यानचंद यांची माहिती सांगितली. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थिनीनी विविध खेळात भाग घेऊन ज्यांची निवड विभागीय व विद्यापीठ स्तरावर झाली त्यांचा गुलाबपुष्प देऊन पाहुण्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रा. डॉ. चौधरी यांनी सांगितले की, लोकसंख्येच्या मानाने आपल्या देशात खेळात फारच सहभाग कमी असतो. मात्र छोटे छोटे देश आज खेळात प्रगती करत आहेत. त्यांनी भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू सावरखेडा एक्सप्रेस व नाशिक जवळील एक खेड्यातील कविता राऊत हिने प्रतिकूल परीस्थित कसे यश मिळविले याचे उदाहरण दिले. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मनातील भीती दूर करून खेळात सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.

प्रा. विनोद पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असून आपण ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त म्हणजे एकूण ८ सुवर्ण पदके हॉकी या खेळात मिळविली आहेत. त्यांनी सुरुवातीस ऑलिम्पिकच्या इतिहास विशद केला.  हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा काळ म्हणजे इ.स. १९२८ ते १९३६ पर्यंत जोपर्यत मेजर ध्यानचंद हॉकी हा खेळ खेळत होते तोपर्यंत सर्वच्या सर्व सुवर्णपदके भारताने जिंकली म्हणून त्या काळास हॉकीच्या सुवर्णकाळ असे संबोधतात.

ध्यानचंद हे आंतरराष्ट्रीय हॉकी विश्वात सर्वश्रेष्ठ ‘सेंटर फॉरवर्ड’ खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्यांना इ.स. १९५६ मध्ये भारत सरकारद्वारे ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात आली. त्यांनी आपल्या भाषणात मेजर ध्यानचंद यांचेविषयी सविस्तर माहिती सांगितली. व प्रत्येक खेळाडूने खेळाकडे करियर या दृष्टीने बघावे असे त्यांनी सांगितले.

तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. माळी यांनी सांगितले कि विद्यार्थांनी खेळात सहभाग घेतला तर तन, मन, धनाने त्या समाजात वावरू शकतात. खेळाच्या माध्यमातून आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकतात. आपला व्यक्तिमत्व विकास करू शकतात व सर्वात महत्वाचे म्हणजे खेळामुळे आपले शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकास खेळासंदर्भात प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांनी सांगितले की, प्रत्येक माणसात हनुमान आहे परंतु जोपर्यंत त्यांना जांबुवंत भेटत नाही तोपर्यंत तो उडू शकत नाही. खेळामध्ये भारतात वेगवेगळ्या महिला नाव कमवीत आहेत त्यात सानिया मिर्झा, पी. व्ही. सिंधू, यांचे उदाहरण दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दामिनी मोरे, व प्रास्ताविक कु.जागृती पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन कु.तनया वावदे हिने मानले. कार्यक्रमास विद्यार्थिनी व प्राध्यापक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

 

LEAVE A REPLY

*