रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 10 लाख लांबविले

0
सोनगीर / देवभाने येथे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत तिघांनी दहा लाखात लुटल्याची घटना आज (ता. 16) सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर घडली.
याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात तीन अज्ञात संशयितांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथून सराफ राजेश निमा याचेकडून अरुण सत्यनारायण राठोड, पुतीन गुप्ता व लोकेश नहार यांनी काल (ता. 15) रात्री सुमारे दोन किलो सोने असलेला डबा घेतला.

खाजगी लक्झरी बसने नाशिकला पहाटे साडेचारच्या सुमारास द्वारका सर्कलला उतरले. अशोक स्तंभाजवळ राहणार्‍या अशोक भाई यांना दोन किलो सोने देऊन त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेऊन सहाच्या सुमारास पुन्हा द्वारका सर्कलला उभे असतांनाच तवेरा (क्रमांक एमएच 46, डब्ल्यू 5876) त्यांच्याजवळ येऊन थांबली.

व चालकाने इंदूरला जात असल्याचे सांगितले. तीनही जण ड्रायव्हरसीटच्या मागे बसले. चालकाशेजारी आधीच एकजण बसला होता. चार किलोमीटर पुढे आल्यावर पुन्हा एक जण धुळ्याला जायचे म्हणून मागे बसला.

साडेआठच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर देवभाने चार पाच किलोमीटर अंतर दूर असतांना चालकाशेजारील युवकाने तिघांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत हिंदीतून मोबाईल व पैशांच्या बॅगेची मागणी केली.

तिघांनी मोबाईल व पैसे देऊन टाकले. त्यानंतर अरुण राठोड याने त्यांच्याशी झटापट केली. तेव्हा मागील सीटवर बसलेल्याने मानेवर कोयता लावला.

देवभाने गावदरवाजाजवळ तवेरा चालकाने युटर्न घेतला. झटापटीमुळे तवेरा दुभाजकाला ठोकली गेली. तवेराची गती मंद झाल्याने पुतीन व लोकेशने दरवाजा उघडून उड्या मारल्या.

थोडे अंतरावर अरुणने चालत्या वाहनातून उडी मारली. त्यात त्याचा हाताला व डोक्याला जखम झाली. दहा लाख रुपये रोख व चार मोबाईल, तीन बॅग व कपडे असे दहा लाख अकरा हजार चारशे रुपयांचा ऐवज संशयित तिघांनी लुटून नेले.

अरुण राठोड याने दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

*