भाजपाची आजपासून शेतकरी संवाद यात्रा

0
धुळे / भाजपातर्फे आयोजित पंडित दिन दयाल उपाध्याय जन्म शताब्दी वर्षानिमित्त भाजपातर्फे आयोजित शेतकरी संवाद यात्रेला उद्या दि. 25 मे पासून सुरूवात होत आहे.
धुळे तालुक्यातील बोरी परिसरातील मांडळ शिवाराच्या शेतबांधावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा सुरू होत आहे.
जिल्ह्यातून सुरू होणारी ही संवादयात्रा महाराष्ट्रभर जाणार असून धुळे तालुक्यातील मांडळ येथे सुरुवात होत आहे. तालुक्यातील बोरकुंड, हेंद्रूण, मोघन, मांडळ आदी गावांच्या शिवेवर शेतकर्‍यांशी संवाद साधला जाईल. यात्रेसाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे, राज्याचे पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल उपस्थितीत राहणार आहेत.

शेतकरी संवाद यात्रेदरम्यान शेतकर्‍यांची कर्ज माफी देण्याकरिता असलेल्या आवश्यक बाबींचे अवलोकन, शेतीमालाला भाव, जलयुक्त शिवार अभियानाची कामे व सदर कामांची पुढची दिशा व दशा ठरविणे, सिंचन विहिरी, विजेच्या समस्या, शेततळे, बी-बियाणे व रासायनिक खतांची उपलब्धता व त्यांचे भाव यासंदर्भात यावेळी चर्चा होणार आहे.

शेतकर्‍यांच्या कल्याणाकरिता राज्यसरकार व केंद्र सरकारची ध्येयधोरणे तसेच आतापर्यंत शेतकर्‍यांच्या हिताची व कल्याणाचे घेतलेले केंद्र व राज्य सरकारचे निर्णय यासंदर्भात माहिती देण्यात येईल. प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी व भूमिपुत्रांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.

त्यावरील उपाय व सरकारची धोरणे हे शेताच्या बांधावरच ठरविण्याचा अभिनव उपक्रम भारतीय जनता पार्टी व सरकारने हाती घेतलेला आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे केंद्राचे प्रतिनिधित्व शेतकर्‍यांसमोर करणार असून राज्याचे प्रतिनिधित्व ना. जयकुमार रावल करणार आहेत. त्याचबरोबर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील या यात्रेत सहभागी होणार आहेत.

शेतकर्‍यांच्या समस्या प्रतिनिधींमार्फत वा अधिकार्‍यांमार्फत न मांडता प्रत्यक्ष शेतकर्‍यांना ही संधी उपलब्ध झालेली आहे. सदर कार्यक्रमास मंडप, स्टेज, कोणताही बडेजाव न करता कार्यक्रम शेतकर्‍यांमध्ये बसून शेताच्या बांधावर होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*