आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी सतर्क रहा !

0
धुळे / आपत्ती व्यवस्थापन सामूहिक जबाबदारी आहे. आपत्तीच्या काळात आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवत सतर्कता बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, नैसर्गिक आपत्ती टाळणे शक्य नसले, तरी तिची तीव्रता कमी करण्यासाठी संबंधित विभागांनी तत्काळ प्रतिसाद दिला पाहिजे. उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करुन बाधितांना मदत मदत कार्यासाठी प्रशासनाने सतर्क राहिले पाहिजे. विभागप्रमुखांनी सतर्क राहिले पाहिजे.

या कालावधीत जिल्हा व तालुकास्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. या कक्षांना 24 तास वीज पुरवठा सुरू राहील, असे नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले.

आपत्तीत शोध व बचावासाठी 43 प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच त्याचे प्रात्यक्षिक घ्यावे. पूर आल्यावर साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. अशा कालावधीत आरोग्य विभागाने साथ रोग नियंत्रणासाठी शीघ्र प्रतिसाद पथके तयार ठेवावीत.

आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी गाव, तालुका पातळीवर बैठक घेवून नियोजन करावे. तालुका व गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे, विविध समित्या व आपत्ती व्यवस्थापनाचे गट, पथक, संपर्क क्रमांक अशी अद्ययावत माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात सादर करावी.

आपत्ती काळात तत्काळ मदतीसाठी संबंधित विभागांनी विभागनिहाय गस्ती पथके तैनात करावीत. सर्व विभागांनी त्यांच्यास्तरावर यंत्रणांची मान्सूनपूर्व बैठक आयोजित करावी अशी सुचनाही पांढरपट्टे यांनी दिले.

 

LEAVE A REPLY

*