ग.स.बँकेवर प्रशासक

0
धुळे / धुळे-नंदुरबार जिल्हा ग. स. बँकेचे संचालक मंडळ सहा महिन्यांसाठी निलंबीत करण्यात आले असून जिल्हा सहकार उपनिबंधक जयसिंग ठाकूर यांची बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूचनांचे पालन केले नाही. तसेच व्यवहारांमध्ये अनेक त्रुटी ठेवल्याच्या कारणावरुन राज्याचे सहकार आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले.
त्यानंतर आज दुपारी एक वाजता प्रशासक म्हणून जयसिंग ठाकूर यांनी बँकेची सूत्रे घेतली.
धुळे-नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूचनांचे पालन केले नाही.
त्यात अनेक त्रुटी आढळल्या. त्यामुळे राज्य पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्रामीण सहकारी बँकेच्या टास्क फोर्स आणि ग्रामीण सहकारी बँक फेडरेशन यांच्यात नागपूर येथे दि.7 एप्रिल रोजी बैठक झाली.

त्यानुसार बँकेच्या संचालक मंडळाचे सहा महिन्यांसाठी निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सेक्शन 110 अ, महाराष्ट्र सहकारी सोसायटी कायदा 1960 नुसार ही कारवाई करण्यात आली.

कालावधीत बँकेच्या विरोधात झालेल्या तक्रारींची दोन महिन्यात चौकशी होणार आहे. बँकेच्या वैधानिक लेखा परिक्षणात चार कोटी 37 लाख 39 हजार रुपयांची तफावत ताळेबंदात आढळून येत असल्याचे सहकार आयुक्तांनी म्हटले आहे. चौकशीचा अहवाल आरबीआयकडे गेल्यावर सहा महिन्यानंतर पुढील निर्णय होईल.

राजेंद्र शिंत्रेंची तक्रार
बँकेच्या व्यवहारासंदर्भात आपल्यामार्फत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आपल्या तक्रारींची दखल घेवूनच सहकार विभागाने संचालक मंडळावर निलंबनाची कारवाई करुन प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतल्याचे तक्रारदार राजेंद्र शिंत्रे यांनी सांगीतले. शिंत्रे यांनी सांगीतले की, बँकेने एटीएम कार्ड इश्यू करु नये, असे बंधन असताना संचालक मंडळाने कॉन्ट्रॅक्टरला काम दिले व अकारण बँकेचा खर्च वाढवला.

बँकेच्या स्टेशनरीचा खर्च अवाढव्य केला. बँक तोट्यात असताना खोट्या पध्दतीने जास्तीचा नफा झाल्याचे दाखवून बँकेला इन्कम टॅक्स भरणे भाग पाडले, बँकेने केवायसीमध्ये त्रुटी ठेवली आहे, बँकेच्या चेअरमनला पाच लाखापेक्षा जास्त कर्ज वितरीत करण्याचे अधिकार नसताना मनमानीपणे कर्जाचे वितरण केले, असा आरोप शिंत्रे यांनी केला आहे.

बँकेच्या संचालक मंडळानेे बेकायदेशीररित्या कर्ज वाटप केले. जीवंत सभासदांना मयत दाखवून कर्जमुक्तीचा फंडा राबविला. बेकायदेशीरपणे सभासदांचा विमा काढला.

ताळेबंदात सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांचा फरक दिसू नये म्हणून दिशाभूल केली. नियमबाह्यरित्या करोडो रुपयांची स्टेशनरी छापली.

कॉम्प्युटर खरेदीत घसार्‍याच्या नावाखाली खर्च दाखविला. अ‍ॅडव्हान्स व हात उचलच्या नावाखाली मनमानीपणे बँकेचा निधी वापरला.

बँकेला आर्थिक नुकसान पोहचवून बनावट व खोट्या वाहनांची बिले टाकली. गेल्या चार ते पाच वर्षात बँकेने 60 ते 70 कोटी रुपयांचा बँकेने गैरव्यवहार केला.

आ.अनिल गोटे यांच्याकडेदेखील आपण यासंदर्भात विविध तक्रारी केल्या होत्या. आ.गोटे यांनी या तक्रारींच्या पाठपुराव्यासाठी प्रयत्न केले, असेही शिंत्रे म्हणाले.

LEAVE A REPLY

*