नाराजांच्या रडारवर मनपा आयुक्त !

0
धुळे / मनपा आयुक्तांच्या शिस्तप्रिय कारभारापुढे अनेकांनी नांग्या टाकल्या असून नियमांच्या पलिकडे जावून आयुक्त कामे करीत नसल्याने मनपा वर्तुळात नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
कोणाला घाबरण्याचे कारण नाही!
मी संपूर्ण काम कायद्याने करते. आपल्या कामात त्रुटी राहणार नाहीत याची काळजी घेते. त्यामुळे कोणाला घाबरण्याचे मला कारण नाही. चांगले काम करणार्‍यांना त्रास होतो, हा माणसाचा स्थायीभाव आहे. चांगल्या कामासाठी कौतुक होते, तेवढे त्रास देणारेही असतात. आपण नियमाला बांधील आहोत. प्रशासनात काम करतांना नियमांचे उल्लंघन करुन कोणाचे समाधान करणे मला जमत नाही. जी पण कामे माझ्या हातून होतील, त्यात पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न आहे. हा आपला तो परका, असा भेदभाव ठेवून मी कामे करीत नाही. शहरातील जनतेला माझ्या कामाची पध्दत पसंतीला उतरली आहे. त्यामुळे माझ्याकडून शक्य होईल तेवढी चांगले कामे करण्याचा प्रयत्न करीत राहीन.
-श्रीमती संगिता धायगुडे आयुक्त, मनपा धुळे

 

याचाच परिणाम म्हणून आयुक्तांच्या विरोधात तक्रारींचा सूर उमटू लागला आहे. यातच आयुक्त संगिता धायगुडे यांच्या शासकीय निवासस्थानावर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेकीचा प्रकार घडल्यामुळे आयुक्त नाराजांच्या रडारावर असल्याचे संकेत मिळू लागले आहे.

आठ-नऊ महिन्यांपुर्वी आयुक्त संगिता धायगुडे यांनी धुळे मनपाचा कार्यभार हाती घेतला. त्यांच्या आधीचे आयुक्त नामदेव भोसले यांना अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागले होते.

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भोसलेंच्या विरोधात जोरदार मोहीम राबवून त्यांची जिल्ह्यातून अक्षरशः हकालपट्टी केली होती. त्यानंतर श्रीमती संगिता धायगुडे यांची धुळे मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती झाली.

स्वच्छतेमध्ये ‘मायक्रो प्लॅनिंग’ आखणार्‍या धायगुडेंनी शहरात दाखल झाल्यानंतर सर्वात प्रथम स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत केले. मनपा हद्दीत राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम, नोटबंदीच्या काळात मनपाची झालेली 15 कोटींची वसुली, क्षयरोग नियंत्रणात मनपाने घेतलेली आघाडी, स्वच्छ शहरांच्या यादीत धुळे मनपाला मिळालेला 124 वा क्रमांक आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मिळालेली कौतुकाची थाप, यामुळे आयुक्त धायगुडेंनी राज्यस्तरावर आपली प्रतिमा तयार केली.

सचिव पातळीपर्यंत अधिकार्‍यांचे धायगुडेंच्या कार्यपध्दतीकडे लक्ष वेधले गेले. 92 टक्के घरपट्टी वसुली, 82 टक्के पाणीपट्टी वसुली, साडेतीन हजार व्यक्तीगत शौचालयांचे बांधकाम पूर्णत्वाला नेण्याचे काम धायगुडेंच्या मार्गदर्शनातून प्रशासनाने केले.

त्याचप्रमाणे अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडलेली 136 कोटीची पाणी योजना गतीमान करण्याचे कार्य गेल्या सात-आठ महिन्यात झाले.

याचा परिणाम म्हणून आयुक्त धायगुडेंच्या कामाचा उदोउदो होवू लागला. रोजचे प्रशासकीय कामकाज हाताळतांना आयुक्तांनी अनेक मर्यादा घालून दिल्या.

नियमांच्या बाहेर कोणतेही काम होवू नये, यावर भर दिला. मात्र शिस्तीच्या बंधनात न राहणार्‍या काही घटकांना याचा त्रास होवू लागल्याने साहजिकच नाराजांची संख्या वाढू लागली.

प्रशासकीय स्थरावर काही कर्मचारी, अधिकारी आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर नाराज झाले. तर भोगवटा प्रकरणात नगरसेवकांना नोटीसा बजावण्यात आल्याने आयुक्त धायगुडे पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडल्या.

काही लोकप्रतिनीधी आणि प्रशासनातील घटक नाराज झाल्यामुळे आयुक्त ‘टारगेट’ ठरू लागल्या आहेत. एवढेच काय पाणी पुरवठा प्रश्नावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक तथा महानगर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी आयुक्तांच्या विरोधात उघड पत्रक काढले.

पाण्याचीसाठी धुळेकरांचे हाल होत असतांना विरोधक आणि प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य यांच्यामुळे माता भगिणींना भर उन्हात डोक्यावर हंडे घेवून फिरावे लागत असल्याचा आरोप मनोज मोरेंनी केला.

पाणीपुरवठाचे नियोजन विस्कळीत झाल्याने सत्ताधार्‍यांची कोंडी करण्यात विरोधकांना यश मिळाले. पाणी हा धुळेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे या प्रश्नावर शहराचे राजकारण तापणार आहे हे निश्चित.

आयुक्तांच्या कार्यपध्दतीबाबत सचिवांकडे तक्रार?

काही नगरसेवकांना भोगवटा प्रमाणपत्रप्रकरणी बजावण्यात आलेल्या नोटीसा आणि काही कर्मचारी व अधिकार्‍यांवर झालेली दंडात्मक कारवाई यामुळे आयुक्तांच्या कार्यपध्दतीबाबत लोकप्रतिनिधींसह प्रशासनातले अनेक घटक नाराज झाले आहेत. यासंदर्भात काही नगरसेवकांनी थेट मंत्रालय स्थरावर आपली तक्रार पाठविली असून आयुक्तांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आयुक्तांच्या कार्यपध्दतीची दखल सरकार कशापध्दतीने घेते याकडे लक्ष लागुन आहे.

LEAVE A REPLY

*