मयुर कॉलनीतील आयुक्तांचा बंगला हटवून बालोद्यान खुले करा !

0
धुळे / शहरातील देवपूर परिसरात असलेल्या मयुर कॉलनीतील बालोद्यानातील आयुक्तांचे निवासस्थान हटवून ते उद्यान परिसरातील नागरीक व लहान मुलांना खुले करुन द्यावे अशी मागणी समाजवादी पक्षाचे नगरसेवक सैय्यद साबीरअली मोतेबर यांनी केली आहे. महापौरांसह स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांना निवेदन देण्यात आले आहे.
प्रभाग क्र. 7 मधील मयुर कॉलनीतील सर्व्हे नं. 19/2 या भूखंडावर तत्कालीन नगरपालिकेतर्फे बालोद्यान उभारण्यात आले असून या उद्यानाचा उपयोग परिसरातील बालकांना खेळण्यासाठी होत नाही.

त्या ऐवजी तेथे आयुक्तांचे निवासस्थान करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. स्थानिक नागरीक, सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात लेखी तक्रारी केल्या आहेत.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोकळ्या जागेवर बांधकाम करता येत नाही मात्र उद्यानाच्या या जागेवर बांधकाम करण्यात आले आहे.

शिवाय नुकतेच दुरस्तीच्या नावाने तेथे लाखो रुपये खर्च करुन प्रशस्त हॉलही बांधण्यात आला आहे. उद्यानातील निम्म्यापेक्षा जास्त जागेवर बांधकाम करण्यात आल्याने मुलांना खेळण्यासाठी जागा उरतच नाही.

आयुक्तांची निवासस्थान तेथून हटवून ते उद्यान खुले करण्यात यावे. तसेच सदर बांधकामाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात स्थायी समितीचे सभापती कैलास चौधरी यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*