मनपात दांगडो, तहसीदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

धुळे / महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता दीड कोटीची मालमत्ता अतिक्रमणात असल्याचा फार्स निर्माण करुन पाडून टाकली.
सदर मालमत्ता पाडणार्‍या तहसीलदारांविरुध्द चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापौर सौ.कल्पना महाले यांनी दिले.
महापालिकेची सभा आज झाली. या सभेत धुळे महापालिकेतील एकूण 35 प्रभाग हागणदारीमुक्त घोषित करण्याचा विषय चर्चेला आला. या चर्चेत शिवसेनेचे नरेंद्र परदेशी, राष्ट्रवादीचे मनोज मोरे, कैलास चौधरी, शिवसेनेचे संजय गुजराथी, गंगाधर माळी, भाजपाच्या प्रतिभा चौधरी यांनी सहभाग घेतला.

महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता देवपूरातील सार्वजनिक शौचालय आणि धोबी घाट अतिक्रमणात असल्याचा फार्स निर्माण करुन पाडून टाकले. यात दीड कोटींचे नुकसान झाले आहे.

मनपाची मालमत्ता कोणीही परस्पर पाडूच शकत नाही. त्यामुळे मनपाचे बांधकाम पाडणार्‍यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी नरेंद्र परदेशी यांनी केली.

हागणदारीमुक्त शहर झाले तर अभय योजनेत सहभाग घेता येईल. तसे होवू नये म्हणून शौचालय व धोबी घाटचे बांधकाम पाडले. मनपात खेळ घालण्याचा प्रयत्न सुरु आहे.

तहसीलदारांचे लेखी पत्र आलेले नाही, मग बांधकाम कसे पाडले? त्यामुळे बांधकाम पाडणार्‍यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे मनोज मोरे यांनी केली.

पांझरा नदीपात्रात असलेला धोबी घाट हा दलित वस्तीसाठी बांधला होता, परंतु तहसीलदार कोणाच्या तरी दबावाखाली काम करतात.

याबाबत दखल घेवून बांधकाम पाडणार्‍यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी स्थायी सभापती कैलास चौधरी यांनी केली.
आ.अनिल गोटे हे महापालिकेत राजकारण करीत आहेत.

कोणाची परवानगी न घेता शौचालय आणि धोबी घाट पाडले. आमदारांच्या दबावाला प्रशासनाने बळी पडू नये. बांधकाम परवानगी न घेता पाडल्यामुळे तहसीलदारांवर गुन्हा दाखल करा व परस्पर अतिक्रमण काढले म्हणून आ.अनिल गोटी यांचा सभागृहाने निषेध करावा, असे शिवसेनेचे संजय गुजराथी यांनी सांगितले.

शौचालय व धोबीघाटाचे अतिक्रमण पाडण्यात शहराच्या आमदारांचा काडीमात्र संबंध नाही, परंतु काही जण आमदार, आमदार म्हणून तोंडसुख घेत आहेत, असे सभागृहात भाजपाच्या प्रतिभा चौधरी यांनी सांगितले.

त्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. चौधरी यांना बोलण्यास मज्जाव केला. यामुळे भाजपाचे सर्व नगरसेवक महापौरांच्या आसनाकडे आले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवकही आसनाकडे धावून गेले.

बराचवेळ सभागृहात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर महापौरांनी खाली बसण्यासाठी सूचना केली. त्यानंतर सभागृहात शांतता निर्माण झाली.

शहर हागणदारीमुक्त व्हावे म्हणून सर्वांची इच्छा आहे. त्यादृष्टिने प्रयत्न सुरु आहेत. शौचालय व धोबीघाट परवानगी न घेता पाडल्याची आयुक्तांनी चौकशी करावी.

या चौकशीत दोषी आढळणार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश महापौर सौ.कल्पना महाले यांनी दिले.

LEAVE A REPLY

*