घरफोडी करणार्‍या चोरट्यास नागरिकांनी पकडले !

0
धुळे / भरदुपारी घरात कोणी नसल्याचे पाहून घरात चोरी करण्यासाठी आले. परंतु घरातील सदस्यांना अचानक जाग आल्याने चोरट्यांनी पळ काढला.आरडाओरड झाल्याने परिसरातील लोकांनी धाव घेवून एका चोरट्यास पकडले.त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
आर्वी, ता.धुळे गावात भवानी चौकात राहणार्‍या राजेंद्र शांताराम पाटील यांच्या घरातील सदस्य बाहेर गेले असल्याने घर बंद होते. ही संधी साधून दोन चोरट्यांनी भरदिवसा या घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला.

या चोरट्यांनी एक ग्रॅम वजनाचे 30 तुकडे, अर्धा ग्रॅम वजनाचे 20 तुकडे असे एकूण 40 ग्रॅम सोने 80 हजार रुपये किंमतीचे आणि 70 हजार रुपयांची रोकड असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरला.

मात्र, राजेंद्र पाटील यांची मुलगी घरी आली असता तिला घराचा एक दरवाजा आतून लावलेला तर दुसरा दरवाजा आडवा केल्याचे दिसल्याने तिला शंका आली.

शिवाय घरात डोकावून पाहिले असता चोरटे घाबरले. त्यातील एकाने तिला धक्का मारुन पळ काढला. तर दुसरा मागील दरवाजाने पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना राजेंद्र पाटील यांच्या मुलीने आरडाओरड केल्याने परिसरातील लोक धावून आले.

त्यांनी पळून जाणार्‍या चोरट्यास पकडून मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना खबर केली असता पोलिस घटनास्थळी पोहचले. नागरिकांनी पकडलेल्या चोरास पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी केला असता त्याचे नाव अन्वरखा नासिरखा पठाण, रा.जामचा मळा, चाळीसगाव रोड, धुळे असल्याचे सांगितले.

तर पळून गेलेल्या साथीदाराचे नाव विकास उर्फ विक्की मोहन चौधरी, रा.दंडेवालेबाबा नगर, मोहाडी असे आहे. याबाबत तालुका पोलिसात घरमालक राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अन्वरखा पठाण व विकास उर्फ विक्की चौधरी या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

तारेची चोरी – निमगुळ, ता.धुळे शिवारातील ताराचंद पाटील यांच्या शेतात असलेली पिंजारी डिपीवरुन 1400 फूट लांबीची अ‍ॅल्युमिनीयम तार चोरट्यांनी चोरुन नेली. या तारेची किंमत नऊ हजार 870 रुपये असून वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता अशोक पाटील यांनी तालुका पोलिसांत तक्रार केल्याने चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
तरुणी बेपत्ता – भडणे, ता.शिंदखेडा येथील 18 वर्षीय युवती रात्री 8.30 च्या सुमारास घरातून निघून गेली. ती घरी परत न आल्याने तिच्या वडिलांनी पोलिसात माहिती दिली. त्यावरुन मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू – न्याहळोद, ता.धुळे येथील बन्सीलाल डोंगर माळी (वय 58) हे शेतात झाड तोडत असताना तोल जावून विहिरीत पडले. मुलगा प्रविण याने ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना विहिरीतून बाहेर काढले. उपचारांसाठी त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी रघुनाथ माळी यांनी सोनगीर पोलिसांत खबर दिल्याने अकस्मात म्त्यूची नोंद झाली.

कामगारास मारहाण – पाणी भरण्यासाठी लुमचा दरवाजा उघडला. तो बंद करण्यास सांगितल्याचा राग येवून एकाचे डोके फोडल्याची घटना सिद्दीकी नगरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. सिद्दीकी नगरातील इकबाल हाजी यांच्या लुम कारखान्यात काम करणार्‍या म.आबदी म.अरीफ अन्सारी हा दि.13 मे रोजी सकाळी 11.30 वाजता लुमचा मागील दरवाजा उघडून पाणी भरण्यास केला असता साजिद सलीम अन्सारी याने त्यास दरवाजा बंद करुन घेण्यास सांगितले. पाणी भरुन झाले की दरवाजा बंद करतो, असे आबीदने सांगूनही राग आलेल्या साजीदने त्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच बोअरींग जवळची स्टीलची बादली डोक्यात मारुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी म.आबीद याने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात तक्रार केली असून साजीद अन्सारीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे

LEAVE A REPLY

*