मुख्यमंत्र्यांवर पडला निवेदनांचा पाऊस !

0
धुळे / मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दि.17 मे रोजी जिल्हा दौर्‍यावर आलेले असतांना निवेदनाचा पाऊस पडला.

मुस्लिम संघर्ष समिती
येथील मुस्लिम ओबीसी एसबीसी संघर्ष समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, संपूर्ण देशात मुस्लिम समाजाची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती बिकट असून हे उच्च न्यायालयाने देखील मान्य केले आहे. पाच टक्के शासकीय विद्यालयात मुस्लिम आरक्षण कायम ठेवून या आरक्षणाला मंजुरी दिली आहे. तरीदेखील शासनाने अध्यादेश काढलेला नाही. त्यामुळे मुस्लिम समाजावर अन्याय होत आहे. तरी मुस्लिम समाजाला त्वरित आरक्षण द्यावे. मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळातर्फे देण्यात येणार्‍या अपेक्षित लाभ अल्पसंख्यांक समाजाला मिळत नसल्याने अल्पसंख्यांक समाजाला त्याचा लाभ व्हावा व प्रलंबित प्रकरणे त्वरित मंजूर करुन धनादेश वाटप करण्यात यावे, अल्पसंख्यांक समाजाचे दारिद्य्र रेषेखालील विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात यावी, राज्याच्या कारागृहात मुस्लिम समुदायाचे लोक बंदिस्त आहेत, त्याबाबतचा सर्व्हे करुन त्यांची सुटका करावी, असे निवेदनात नमुद केले आहे. निवेदनावर अशपाक शेख, जमील युसूफ शाह, अन्सारी अताऊ रहेमान, लुकमान शेख, बिलाल अन्सारी, जलीम आफताब, अ‍ॅड.अजीम पटेल, इम्रान शेख, सलीम अन्सारी, सईद शेख, जुबेद अन्सारी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

दलितमित्र महासंघ
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून सामाजिक क्षेत्रातील ज्या कार्यकर्त्यांना दलितमित्र व सध्याचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देवून सन्मानित केले जाते अशा व्यक्तींना मासिक मानधन लागू करुन स्वातंत्र्य सैनिकांच्या सवलती मिळाव्यात, अशी मागणी दलितमित्र महासंघाने केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सामाजिक न्याय विभागाकडून ज्या कार्यकर्त्यांना दलित, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते अशा व्यक्तींना 30 हजार रुपये मासिक मानधन लागू करण्यात यावे, स्वातंत्र्य सैनिकांना मिळणार्‍या सोयी सुविधा त्यांना देण्यात याव्यात, सामाजिक न्याय विभागाकडून ज्या कार्यकर्त्यांना दलितमित्र, समाजभूषण, अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानित केले जाते त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विभागाकडील महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट करुन मोफत वैद्यकीय सेवा देण्यात याव्या, शासनाच्या दहा टक्के आरक्षित कोट्यातून तसेच म्हाडा अंतर्गत बांधलेल्या इमारतींमध्ये दलितमित्रांना सदनिका राखीव ठेवाव्यात, एस.टी.महामंडळाच्या इतर गाड्यांप्रमाणे डिलक्स बस, शिवनेरी बसमधून मोफत प्रवाशांची सवलत मिळावी तसेच एस.टी.महामंडळाची राज्याबाहेर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत मोफत प्रवासाची सवलत द्यावी, शासनाच्या विविध जिल्हा व राज्य पातळीवरील समित्यांमध्ये दलितमित्रांना सदस्य म्हणून घ्यावे. केंद्र शासनाकडून रेल्वे प्रवाशांची मोफत सवलत मिळावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर महासंघाचे अध्यक्ष वाल्मिक दामोदर, कार्याध्यक्ष एम.जी.धिवरे, उपाध्यक्ष रमेश श्रीखंडे, सरचिटणीस साहेबराव भामरे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

कर्मचारी संघटना
येथील पदविधर अंशकालिन कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई येथे 7 एप्रिल 2016 रोजी आपल्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक व 5 डिसेंबर 2016 रोजी नागपूर येथे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शासननिर्णय पारित करण्याचा व 15 फेब्रुवारी 2017 अखेर काम करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची कोणतीही कारवाई झालेली नाही. सद्य:स्थितीत मंत्रालयीन स्तरावर संचयिका परिपूर्ण तयार करुन संबंधित विभागाचे सचिव कौशल्य विकास यांच्याकडे याबाबत त्वरित निर्णय घेवून न्याय द्यावा, असे निवेदनात नमुद केले आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रणजित चव्हाण, प्रदेशाध्यक्ष रेखा अहिरराव यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

स्त्री शक्ती सामाजिक संस्था
टोकर कोळीचे दाखले मिळावेत म्हणून आदिवासी कोळी समाज महिलांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या सूचित कोळी लोकांचे अनुसूचित जमाती म्हणून उल्लेख असूनही खान्देशातील सर्व आदिवासी कोळी बांधवांचे गेल्या 20 वर्षांपासून होत असलेले शोषण थांबवावे व टोकर कोळीचे दाखले पूर्ववत द्यावे, जात पडताळणीच्या नावावर नोकरदारांना होणारा त्रास थांबवावा. निवेदनावर गितांजली कोळी, शोभा ठाकरे, कविता कोळी, प्रेरणा सोनवणे, संगीता कोळी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

200 खाटांचे रुग्णालय सुरु करा
शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयात 200 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष सौ.गायत्रीदेवी जयस्वाल यांनी केली आहे.
जिल्हा रुग्णालयाचे चक्करबर्डी येथे स्थलांतर करण्यात आले. परंतु हे रुग्णालय शहरापासून दहा कि.मी. अंतरावर आहे. यामुळे गरीब व सर्वसामान्य जनतेला परवडत नाही. जुने जिल्हा रुग्णालयात 200 खाटांचे रुग्णालय सुरु करावे, तसेच धुळ्यात कृषी विद्यापीठ द्यावे असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सौ.गायत्रीदेवी जयस्वाल, प्रभादेवी परदेशी, विमल बेडसे, सुरेखा बडगुजर, बानुताई शिरसाठ यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

*