महिलेवर तलवार हल्ला : दोघांविरुद्ध गुन्हा

0
धुळे / अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्या महिलेवर तलवारीने हल्ला करुन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील सदिच्छा नगरात राहणारे सुनील झिपा मराठे यांची पत्नी पुष्पा ही घराच्या मागील बाजूस धुणे धुत असताना नीलेश नितीन पवार व चेतन नितीन पवार यांनी संगनमत करुन सुनीलचा साडू नितीन पवार व पुष्पा यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पुष्पाला लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करुन दमदाटी केली.
नीलेश नितीन पवार याने पुष्पा मराठेवर तलवारीने हल्ला केला. तिच्या डोक्यावर व दोन्ही हातावर गंभीर जखमा झाल्या. तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद सुनील झिपा मराठे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली.
भादंवि 307, 323, 504, 506, 34 सह आर्मअ‍ॅक्ट 4/25 प्रमाणे नीलेश नितीन पवार आणि चेतन नितीन पवार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई आर.जी.माळी हे करीत आहेत.

झाडांना अचानक आग – शहरातील ऐंशी फुटी रस्त्यावर नटराज चित्रमंदिराच्या आवारातील काही झाडांना अचानकपणे लागल्याने ती आग नागरिकांनी आटोक्यात आणली. चित्रपटगृह गेल्या काही महिन्यापासून बंद आहे. त्याच्या आवाराभोवती मोठ्या उंचीच्या संरक्षण भिंती बांधल्या आहेत. आग लागल्याने भिंतीलगत धूर आल्याने नागरिकांच्या लक्षात आले.

महिला ठार – आर्वी, ता.धुळे शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हॉटेलच्या बाहेर असलेल्या जाळीवर कार धडकल्याने या अपघातात कारमधील महिला ठार झाली.
अपघाताची नोंद तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. ओझर येथे राहणारे बाळकृष्ण विठ्ठल वडनेरे हे दि.17 मे रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरुन एमएच 15 ईजी 2810 ने प्रवास करीत असताना आर्वी शिवारातील हॉटेल साईनाथजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या ग्रीलवर कार जावून आदळल्याने झालेल्या अपघातात एक महिला व वडनेरे हे जखमी झाले. दोघा जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता त्या महिलेला मृत घोषित करण्यात आले. त्या महिलेची ओळख पटू शकलेली नाही. याबाबत पोना जे.एस.ईशी यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

शिरपूर कॉटेज हॉस्पिटलमध्ये दांगडो
शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये ओम सुभाष नेरकर (वय 36) हे उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्या खोलीत भिवन हिदाद शेख मेहतर हा सफाई करण्यासाठी दि.17 मे रोजी सायंकाळी सात वाजता आला. त्यावेळी डॉक्टर रुममधून भिवन हा दरवाजा उघडून ओम जवळ आला व त्याने ओमचा हात धरुन डॉक्टर रुमकडे आणत असताना भिवनने त्याच्या हाताला झटका दिला. त्याचा राग ओमला आल्याने त्याने ब्लेडने भिवनला गळ्याजवळ भोसकून जखमी केले. तसेच डॉक्टर रुममध्ये जावून लोखंडी कपाट खाली पाडून टेबलवरील टिव्ही जमिनीवर फेकून दिला. तसेच काचेचा आरसा फोडून दवाजाचे नुकसान केले, अशी फिर्याद भिवन हिदाद शेख मेहतर यांनी फिर्याद दिली. भादंवि 324, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

ठिबक सिंचनाचे दीड लाखांचे साहित्य चोरले
गोंदूर, ता.धुळे शिवारात छोटूलाल भिवसन पाटील, विनोद भिवसन पाटील, प्रकाश हरी पाटील, प्रकाश नथ्थू पाटील यांच्या मालकीचे शेत गट क्र.159 ब ही शेतजमिन आहे. तेथे ठिबक सिंचन करण्यासाठी साहित्य ठेवण्यात आले होते. अज्ञात चोरट्याने 68 हजार रुपये किंमतीची ठिबक नळीचे 17 बंडल, 64 हजार रुपये किंमतीचे ठिबक नळीचे 16 बंडल, 10 हजार 50 रुपयांचे ठिबक नळीचे तीन बंडल, त्याच किंमतीचे तीन बंडल आणि 3685 रुपये किंमतीचे फिल्टर असा एक लाख 55 हजार 785 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. याबाबत छोटूलाल भिवसन पाटील यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि प्रकाश पाटील हे करीत आहेत.

उघड्या घरातून 60 हजारांचा मुद्देमाल लांबविला
दोंडाईचा, ता.शिंदखेडा येथे सिंधी कॉलनीत राहणारे भगवानदास नारायणदास रुपचंदाणी यांच्या मालकीच्या घरात अज्ञात चोरट्याने दि.16 मेच्या सकाळी 11.30 ते 17 मेच्या सकाळी सात वाजेदरम्यान प्रवेश करुन घरातून 4100 रुपये किंमतीचा मोबाईल, 45 हजार रुपये रोकड, तीन हजार रुपये किंमतीचा मोबाईल, आठ हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल, 20 हजार रुपये किंमतीची एमएच एई 3731 क्रमांकाची मोटारसायकल असा 60 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत भगवानदास नारायणदास रुपचंदाणी यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भादंवि 380, 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ बी.आर.कदम हे करीत आहेत. दोंडाईचा शहरात गेल्या काही दिवसांपासून चोर्‍या व घरफोडींचे प्रमाण वाढले आहेत. हे वाढते प्रमाण पोलिसांपुढे एक आव्हान आहे.

LEAVE A REPLY

*