वालखेडा येथे घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास : एकास अटक

0
धुळे / वालखेडा, ता.शिंदखेडा येथे घरफोडी होवून चोरट्यांनी स्वयंपाक घरातील स्टीलच्या डब्यातून एक लाख रुपये व 20 हजार रुपयांची मोटारसायकल असा एक लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला, परंतु एकाला ग्रामस्थांनी पकडून नरडाणा पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत माहिती अशी की, वालखेडा, ता.शिंदखेडा येथे राहणारे राजेंद्र संतोष अहिरे या शेतकर्‍याच्या घरात दि.15 मे रोजी दुपारी 2.30 वाजता दोन चोरटे घुसले.
त्यांनी स्वयंपाक घरात ठेवलेल्या स्टीलच्या डब्यात ठेवलेले एक लाख रुपये व घराबाहेर लावलेली 20 हजार रुपये किंमतीची एमएच 18 एके 7994 क्रमांकाची मोटारसायकल चोरी करुन घेवून जात असताना जगदीश यशवंत पाटील, रा.धुळे याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत नरडाणा पोलिस ठाण्यात राजेंद्र संतोष अहिरे यांनी फिर्याद दिली. भादंवि 380, 34 प्रमाणे भैय्या भगवान पाटील, जगदीश यशवंत पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाईल चोरी – शहरातील संघमा चौकात प्लॉट नं.114 मध्ये राहणार्‍या वैशाली भाईदास गांगुर्डे या दि.30 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता शहरातील जेलरोडने पायी जात असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दोन जण मोटारसायकलवरुन आले व त्यांनी वैशाली यांना धक्काबुक्की करुन त्यांच्या हातातील 11 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळून गेले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात वैशाली गांगुर्डे यांनी फिर्याद दिली. भादंवि 392 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

नळ्यांची चोरी – सरवड, ता.धुळे येथे राहणारे प्रफुल्ल गिरधर पाटील यांच्या मालकीची सरवड शिवारात शेती आहे. अज्ञात चोरट्याने त्यांच्या शेतातून ठिबक सिंचनाच्या प्लास्टीक नळ्या 30 हजार रुपये किंमतीच्या चोरुन नेल्या. याबाबत सोनगीर पोलिस ठाण्यात प्रफुल्ल गिरधर पाटील यांनी फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तरुणी बेपत्ता – कापडणे, ता.धुळे येथे राहणारी जयश्री सतीष पाटील (वय 19) ही तरुणी कपडे घेण्यास जावून येते, असे सांगून घरातून गेली, ती घरी परत आलीच नाही. याबाबत सतीष हिंमतराव पाटील यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

अती दारुसेवनाने मृत्यू – तरवाडे, ता.धुळे येथे राहणारा बाबुलाल रामभाऊ पाटील (वय 45) याने दि.15 मे रोजी दुपारी 4.15 वाजता अतिप्रमाणात दारु सेवन केल्याने त्याला त्रास होवू लागल्याने सर्वोपचार रुग्णालयात किरण धर्मा पाटील यांनी दाखल केले. उपचार घेत असताना बाबुलालचा मृत्यू झाला. याबाबत पोना टी.सी.चंद्रात्रे यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गळफास घेवून आत्महत्या – कासारे, ता.साक्री येथे राहणारा सुरेश पंडीत देसले (वय 52) याने दि.15 मे रोजी दुपारी 3.30 वाजता साक्री साखर कारखाना परिसरातील निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत कैलास पंडीत देसले यांनी साक्री पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अकस्मात मृत्यू – दोंडाईचा, ता.शिंदखेडा येथील सोनार गल्लीत राहणारा रवींद्र दिनकर शिंपी (वय 38) हा दि.15 मे रोजी पहाटे सहा वाजता घराच्या छतावर मृतावस्थेत आढळला. याबाबत सिताराम आत्माराम शिंपी यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वृध्द जखमी – मुकटी, ता.धुळे येथे राहणारे भिकनराव नाना पाटील (वय 88) हे दि.15 रोजी दुपारी चार वाजता जळगाव-सुरत महामार्गावर धुळे येथे जाण्यासाठी एस.टी. बसची वाट पहात असताना मुकटी बसस्टँडजवळ एमएच 18 एन 7168 क्रमांकाच्या ओम्नी व्हॅनने धडक दिली. यात भिकनराव हे गंभीर जखमी झाले. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात भिकनराव नाना पाटील यांनी फिर्याद दिली. भादंवि 279, 337, 338 सह मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 177 प्रमाणे मारुती व्हॅन चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाला मारहाण – झोतवाडे, ता.शिंदखेडा येथे राहणारे उत्तम हिलाल चौरे यांना शुल्लक कारणावरुन कृष्णा महादू भिल, वासू महादू भिल, सुकदेव महादू भिल या तिघांनी काठीने व हाताबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत दोंडाईचा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. भादंवि 324, 323, 504, 506, 34 अन्वये तिघांविरुध्द शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*