शेतकर्‍यांच्या संपामुळे लाखोंचे नुकसान

0
धुळे / शेतकर्‍यांचे कर्ज माफ करा, कृषी मालाला दर द्या या प्रमुख मागण्यांसाठी आज शेतकर्‍यांनी संप पुकारला. यामुळे जिल्ह्यातील चारही बाजार समितींवर त्याचा परिणाम झाला.
बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प झाले. यात लाखोंचा महसुल बुडाला आहे तर लोक क्रांतीसेना आणि सत्यशोधक जनआंदोलनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
आज जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी संप पुकारला त्यामुळे दुग्ध व्यवसाय व बाजार समितीवर परिणाम झाला. बाजार समितींमध्ये कमी प्रमाणात आवक झाली, यामुळे लाखोंचा महसुल बुडाला आहे.
शेतकर्‍यांनी संप पुकारला असला तरी प्रशासनाने मात्र या संपाचा परिणाम होणार नाही त्यादृष्टीने नियोजन केले आहे.

लोकक्रांती सेनेतर्फे भजन आंदोलन- राज्यात सुरु झालेल्या शेतकर्‍याच्या संपात सहभागी होण्यासाठी व शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी लोक क्रांती सेना शेतकरी आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला प्रारंभ झाला. यावेळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी गाण्यात आलेल्या भजनात शेतकरी कर्जमुक्तीसह विविध मागण्यांचा समावेश होता. तसेच शासनाचा शेतकरी विरोधी असलेल्या धोरणांचा समाचारही घेण्यात आला.

शासनाने शेतकर्‍यांना तात्काळ कर्जमुक्त केले नाही, तर आपले हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा लोक क्रांती सेना शेतकरी आघाडीतर्फे देण्यात आला.

आठ तास मोफत वीज, शेती उत्पादीत मालाला हमीभाव, दुधाला प्रतिलिटर 60 रुपये हमी भाव, 60 वर्षावरील शेतकर्‍यांना सहा हजार रुपये पेन्शन, स्वामीनाथन आयोगाची काटेकोरपणे अंमलबजावणी आदी विविध मागण्यांचे जिल्हाधिकारी श्री. पांढरपट्टे यांना देण्यात आले आहे.

सत्यशोधक जनआंदोलन- शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सत्यशोधक जनआंदोलनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात कॉ.सिध्दार्थ जगदेव, राहुल वाघ, अमोल जाधव, शत्रुघ्न शिंदे, सिध्दांत बागुल, संजय सोनवणे आदिंसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*