समाज घडविण्यासाठी ग्रंथवाचनाची गरज !

0

धुळे । संवेदनशिल समाज घडविण्यासाठी ग्रंथांचे वाचन महत्त्वाचे आहे. आजच्या ई माध्यमांच्या युगात प्रभावी माध्यम म्हणून ग्रंथच महत्त्वाचे ठरत आहेत. कारण त्यामुळेच इतिहास जीवंत आहे.

सोशल मिडियावरील ज्ञान ग्रंथांसमोर फिके ठरले. त्यामुळेच युवकांनी ग्रंथ वाचनाकडे वळावे, असे प्रतिपादन धुळे ग्रंथोत्सवात आयोजित परिसंवादात मान्यवरांनी केले.

शहरातील आयएएम हॉलमध्ये आयोजित धुळे ग्रंथोत्सव 2017 परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात प्रा.विलास चव्हाण, प्रा.डॉ.फुला बागूल, प्रा.सदाशिव सूर्यवंशी, प्रा.डॉ.पुष्पा गावीत आदी सहभागी झाले होते.

या परिसंवादात प्रा.विलास चव्हाण म्हणाले की, चरित्रवान समाज घडविण्यासाठी बदलत्या काळानुसार साहित्य निर्मिती केली पाहिजे. विकसित अनुभवातून खर्‍या अर्थाने साहित्य निर्मिती होत असते.

केवळ साहित्य निर्मिती करुन उपयोग नाही तर ते लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न देखील केले पाहिजे. साहित्य निर्मितीसाठी वाचन व अभ्यास ही दोन कौशल्य आत्मसात असणे महत्त्वाचे आहे. त्यातूनच खर्‍या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढू शकते, असे प्रा.चव्हाण यांनी सांगितले.

या परिसंवादात डॉ.फुला बागूल म्हणाले की, आज मोठ्या प्रमाणात सोशल मिडियाचा वापर होत आहे. व्हॉटसअ‍ॅप, व्टिटर, फेसबुक, ब्लॉग असे अनेक माध्यमे आहेत.

यातच प्रभावी माध्यम म्हणजे ग्रंथ. त्यामुळे सोशल मिडियावरील संदेश वाचण्यापेक्षा ग्रंथांचे वाचन प्रभावी आहेत. ग्रंथ वाचण्यासाठी नेटपॅकची आवश्यकता नसते.

सोशल मिडियामुळे अडचणी निर्माण होवू शकतात. त्यामुळे ग्रंथाचे वाचन अधिक महत्त्वाचे आहे, परंतु दुर्दैवाने आज ग्रंथांचे वाचन कमी होत चालले आहे. त्यामुळे येणार्‍या काळात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेही डॉ.बागूल म्हणाल्या.

युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्वप्रथम भाषेतील न्यूनगंड दूर करावा. वाचनाअभावी आपल्यातील भाषिक नागरिक संपत चालला आहे. ग्रंथांमुळेच खर्‍या अर्थाने माणूस घडू शकतो, असे परिसंवादात डॉ.पुष्पा गावित म्हणाल्या.

तर प्रा.सूर्यवंशी म्हणाले की, जगभरात आजपर्यंत ज्या क्रांती झाल्या, त्याच प्रेरणादायी आहेत आणि त्या केवळ ग्रंथ व वाचन संस्कृतिने झाल्या. त्यामुळे कोणत्याही माध्यमांपेक्षा ग्रंथ सरस ठरु शकतात, परंतु आज ग्रंथांचे वाचन कमी झाल्यामुळे वाचन संस्कृती धोक्यात आली आहे. त्यामुळे सोशल मिडियावरुन ग्रंथांचे वाचन होणे महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

*