खेळाडूंच्या सिंगापूरमधील प्रदर्शनाने भारावलो

0

शिरपूर । शिरपूरसारख्या आदिवासी व छोटयाशा तालुक्यातील खेळाडूंनी मुंबईनंतर सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन मॅरेथॉनमध्ये यशस्वी ठरल्याची बाब आनंददायी आहे.

संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा नेहमीच पुरविण्यात येत असून विविध खेळांसाठी एकूण 40 विशेष प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिरपूरचे विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमी चमकावेत, ही प्रामाणिक भावना असून आदिवासी भागातील खेळाडूंनी सिंगापूर येथे घवघवीत यश संपादन केल्याने आम्ही भारावलो असल्याचे मत माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी व्यक्त केले.

सिंगापूर येथे शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या पाच खेळाडू हजारो धावपटूंमध्ये सहभागी होवून 10 कि.मी. व 21 कि.मी. अंतर धावणे मॅरेथॉन स्पर्धेत जिद्दीने धावले व तेथे बाजी मारण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

यात नारायण पावरा याने 6 वा क्रमांक पटकावला असून जगन पावरा याने 9 वा क्रमांक, चेतना पटेल हिने 94 वा क्रमांक व अश्विनी चौधरी हिने 107 वा क्रमांक प्राप्त करुन शिरपूरसह भारताचे नाव उज्ज्वल केल्याची बाब शिरपूरकरांसाठी भूषणावह आहे.

सोमनाथ पावरा याने 21 कि.मी. अंतर धावतांना चुकून 42 कि.मी. अंतराच्या ट्रॅकमध्ये गेल्याने फार थकल्याने मेडीकल ट्रीटमेंट घेवून त्याने दुप्पट अंतर धावल्याने कमाल व धमाल केल्याचे चित्र दिसून आले.

शिरपूरच्या पाच खेळाडूंसह मुंबईचे चार खेळाडूंचा सिंगापूर भारतीय दुतावासातील उप उच्चायुक्त (राजदूत) निनाद देशपांडे यांनी सन्मान केला होता. त्यानंतर प्रत्यक्ष मॅरेथॉन मध्ये पाचपैकी तिन शिरपूरच्या खेळाडूंनी चांगली मजल मारली. यामुळे शिरपूरसह भारताच्या क्रीडाक्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सिंगापूर येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत शिरपूरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करुन आंतरराष्ट्रीय स्तराच्या नेहमीच्या प्रोफेशनल खेळाडूंसह धावून स्वत:मध्ये वेगळा आत्मविश्वास निर्माण केला आहे.

याबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, शिरपूर टेक्सटाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, एस.व्ही.के.एम. संस्थेच्या स्पोर्टस् डव्हायजरी कमिटीचे व्हाईस चेअरमन नवीन शेट्टी, संस्था सचिव प्रभाकरराव चव्हाण, अ‍ॅडव्हायजरी कमिटीचे मॅनेजर प्रदिप संपत, मुख्य वित्त अधिकारी नाटुसिंग गिरासे, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, सीईओ डॉ.उमेश शर्मा यांनी कौतुक केले आहे.
नारायण पावरा याने पुरुष गटातून 10 कि.मी. अंतर 35.02 मिनीटात पार करुन 6 वा क्रमांक प्राप्त केल्याची तसेच 14 ते 19 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावल्याची बाब खूपच कौतुकास्पद आहे.जगन पावरा याने पुरुष गटातून 10 कि.मी. अंतर 38.12 मिनीटात पार करुन 13 वा क्रमांक प्राप्त केला. तसेच 14 ते 19 वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावल्याने आनंद व्यक्त करण्यात आला.चेतना पटेल हिने महिला गटात 10 कि.मी. अंतर 51.12 मिनीटात पार करुन 94 वा क्रमांक तर 14 ते 19 वर्षे वयोगटात 5 वा क्रमांक पटकावल्याची बाब खूपच समाधानकारक आहे. अश्विनी चौधरी हिने महिला गटात 10 कि.मी. अंतर 52.13 मिनीटात पार करुन 107 वा क्रमांक तर 14 ते 19 वर्षे वयोगटात 6 वा क्रमांक प्राप्त केला.

सोमनाथ पावराचे कौतुक- सोमनाथ पावरा याने सर्वात महत्वपूर्ण सहभाग नोंदविला. परंतु,विजय थोडक्यात हूकला. त्याने पुरुष गटातून 21 कि.मी.अंतर धावतांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतांना थोडा अनुभवाचा अभाव असल्याने चुकून ट्रॅक बदलल्याने 42 कि.मी. अंतर धावायला लागला.

या दरम्यान तो खूप थकला. एक तास त्याला मेडीकल ट्रीटमेंट देण्यात आली. त्यानंतर पाणी न घेताच त्याने 42 कि.मी. अंतर धावणे पूर्ण केले. यासाठीचा त्याचा संपूर्ण वेळ होता 3.56.03 तासांचा.

म्हणजे मैदानावर कोसळल्यावर सुद्धा जिद्दीच्या जोरावर मेडीकल ट्रीटमेंट घेवून त्याने संपूर्ण क्रीडाकौशल्ये वापरुन मॅरेथॉन पूर्ण केले. याबद्दल त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष कौतुक करण्यात आले.

शिरपूरचे नारायण पावरा, सोमनाथ पावरा, जगन पावरा, चेतना पटेल, अश्विनी चौधरी यांच्यासह मुंबई एस.व्ही.के.एम. संस्थेचे मिहीर, शिवम त्यागी, श्रुती सरण, सिमरन शर्मा या खेळाडूंनी देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

शिरपूरच्या सर्व खेळाडूंचा शिरपूर येथील आर.सी.पटेल फार्मसी कॅम्पसच्या मैदानावर नियमित सराव करुन घेण्यात आला. तसेच व्यायाम, आहार व सरावाचे धडे देण्यात आले.

आर.सी.पटेल शैक्षणिक संकुल व एस.व्ही.के.एम. संस्था, मुंबई यांच्या वतीने माजी शिक्षणमंत्री, संस्थेचे अध्यक्ष अ.अमरिशभाई पटेल व संस्थेचे सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीसह अथक परीश्रमातून खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच प्रयत्न सुरु आहेत.

LEAVE A REPLY

*