सर्वोपचार रुग्णालय दुरुस्तीसाठी तीन कोटी

0

धुळे । बंद अवस्थेत असलेले जिल्हा सर्वोपचार रुग्णालय पुन्हा सुरु करण्यासाठी संपुर्ण इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी 3 कोटी रुपयांचा अपेक्षित निधी उपलब्ध करुन द्यावा आणि 200 खाटांचे सर्वोपचार रुग्णालय तात्काळ सुरु करावे, अशा मागणीचे स्मरणपत्र माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री ना.डॉ.दिपक सावंत यांना मुंबई येथे दिले.

येत्या जानेवारीत निधी वर्ग करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी याप्रसंगी प्रा.पाटील यांना दिले. निवेदन देतेवेळी मंत्रालयात आरोग्य सचिव श्री.संजीवकुमार, सहसचिव डॉ.व्यास, आरोग्य संचालक डॉ.सतिष पवार, सहसंचालक श्री.मोहन जाधव आदी उपस्थित होते.

धुळ्यातील जुने सर्वोपचार रुग्णालय 16 मार्च 2016 पासून विना वापर पडून आहे. जुने सर्वोपचार रुग्णालय वैद्यकीय महा-विद्यालयात चक्करबर्डी येथे स्थलांतरित झाल्याने सर्वोपचार रुग्णालय बेवारस अवस्थेत आहे.

त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील जुने फर्निचर व वैद्यकीय साहित्य चोरीला जाऊन रुग्णालय मोडकळीस आले आहे. सदर रुग्णालयात 200 खाटांचे नवजात शिशू व महिला व सर्वोपचार रुग्णालय सुरु करण्यासाठी 307 पदे मंजूर करण्यात आली असून यापैकी 75 कर्मचारी रुजूही झाले आहेत.

सदर रुग्णालय आहे त्या अवस्थेत सुरु करण्याचा घाट आरोग्य प्रशासनाने घेतल्या मुळे शिवसेनेने सर्वोपचार रुग्णालय सुरु होऊ न देण्यासाठी विरोध दर्शविला आहे. रुग्णालय सुव्यवस्थित करुनच सुरु करा व रुग्णांच्या आरोग्याशी खेळू नका, अशी भूमिका शिवसेना पक्षाने घेतली आहे.

रुग्णालय दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत संरचना लेखापरिक्षणानुसार 3 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी 1 कोटी 80 लाख बांधकाम दुरुस्तीसाठी तर 96 लाख विद्युत यंत्रणेचे नुतनीकरणासाठी आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

*