धुळ्यात 15 टन गो-मांस जप्त

0

धुळे । शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीजवळ बेकायदेशीरपणे सुरू असलेला कत्तलखाना पोलिसांनी उघडकीस आणला असून या ठिकाणाहून गुरांचे सुमारे 15 टन मांस तसेच ते वाहून नेण्यासाठीचे ट्रक, पिकअप व्हॅन व अन्य साहित्य असा 28 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मालेगावच्या एका तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत चाळीसगाव रोड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीजवळ साई किनारा लॉजच्या बाजूला जैद साबीर भंगारवाला याच्या गोडावूनमध्ये बेकायदा कत्तलखाना सुरु होता.

पोलिसांनी सकाळी 11 वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता तेथे जनावरांचे मांस आढळून आले. 140 प्लॉस्टिक ड्रममध्ये सुमारे 15 टन मांस भरुन एमएच04/सीए 790 आणि पिकअप व्हॅन एमएच 41/जी 2412 या वाहनातून घेवून जाण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी वाहनासह मांस, इलेक्ट्रीक काटा, ड्रम, कोयता, कुर्‍हाड, सिडी आदी सुमारे 28 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. ताब्यात घेतलेल्या मांसाची वरखेडी रोडवर विल्हेवाट लावण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणी पो.कॉ.जोएब पठाण यांची फिर्याद नोंदवून घेत मालेगाव येथील कमालपुर्‍यात राहणार्‍या शफिक अहमद खलील अहमद कुरैशी या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव रोड पोलिसांनी ही कारवाई एपीआय सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केली. पुढील तपास उपनिरीक्षक आहेर यांना सोपविला आहे.

LEAVE A REPLY

*