मनपा निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार !

0

धुळे । महापालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाशी भाजपा युती करणार नाही.निष्ठावान कार्यर्त्यांनाच संधी दिली जाईल.

त्यांच्या जोरावरच महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार आहे. त्यासाठी कार्यर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आ.अनिल गोटे यांनी केले.

शहरातील कल्याण भवनात भारतीय जनता पार्टीचा शहर मेळावा घेण्यात आला. यावेळी विधानसभा क्षेत्राचे पालक म्हणून आ.गोटे यांनी मार्गदर्शन केले. बुथरचना, मनपाची प्रभाग रचना यानुसार कार्यकर्त्यांनी आपले नियोजन करावे, अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

माजी आ.धरमचंद चोरडीया, माजी संघटनमंत्री भिमसिंग राजपूत, माजी जिल्हाध्यक्ष सुनिल नेरकर, अ‍ॅड.संभाजी पगारे, संजय बोरसे, दिलीप सांळुखे, तेजस गोटे, रत्ना बडगुजर, प्रतिभा चौधरी, वैभवी दुसाने, वालीबेन मंडोरे, निलम होरा, विजय वाघ, योगेश मुकुंदे, ओम खंडेलवाल, अमित खोपडे, सागर कोडगीर, डॉ.महेश घुगरी, बंटी धात्रक, विजय वाघ यावेळी उपस्थित होते.

आ.गोटे याप्रसंगी म्हणाले की, संघटन बांधणी उत्तम करा. वर्षानुवर्ष ज्यांनी काम केले त्यांनाच व्यासपीठावर मान मिळेल. आयत्यावेळी आलेल्यांना माझ्याकडे स्थान नाही. पक्षासाठी झिजणार्‍या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक दिली जाईल.

निष्ठावान आणि जुन्या कार्यकर्त्यांचाच पक्ष विचार करेल. त्यामुळे संघटनेत काम करतांना कोणत्याही कार्यकर्त्याने कोणाचीही गुलामगिरी करु नये.पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनच आपले कर्तव्य बजवा. ताठ मानेने आणि एकदिलाने भाजपाचा झेंडा महापालिकेवर फडकण्यासाठी कामाला लागा.

असे सांगुन आ.गोटे म्हणाले की, भाजपा स्वबळावर रिंगणात उतरणार असल्याने मनपा निवडणूक निष्ठावंतांच्या ताकदीवरच लढविली जाईल.पैशाच्या ताकदीवर निवडणूका जिंकणार्‍यांना यावेळी अद्दल घडवा.

जे कोणी आयत्यावेळी पक्षात येतात, त्यांच्यामुळे जुने कार्यकर्ते नाराज होतात. ही बाब मी पक्षश्रेष्ठींना कळविली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या मेळाव्याला मात्र भाजपाचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांची अनुपस्थिती होती.

LEAVE A REPLY

*