मनपातर्फे क्षयरोग रुग्ण शोधमोहीम राबविणार !

0

धुळे । सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हा राज्यामध्ये सर्व जिल्हे व महानगरपालिकांमध्ये केंद्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वावर सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येतो.

केंद्रशासनातर्फे अद्यापही क्षयरोग निदानापासून वंचित असणार्‍या क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे शोधून काढण्यासाठी 2017 मध्ये क्षयरुग्ण शोध मोहिम तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्र राज्यात राबविण्यात ठरविले आहे.

त्यानुसार तिसरा टप्पा दि. 4 ते 18 डिसेंबर दरम्यान धुळे शहरातील 90,000 लोकसंख्येला म्हणजेच अंदाजित 15 हजार घरांना आरोग्य कर्मचारीद्वारे गृहभेट देवून प्रत्यक्ष सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम राबविली जाणार आहे.

सदर मोहिमेसाठी 36 पथके तयार केलेली असून त्यात 72 टिम सदस्य, 12 पर्यवेक्षक व क्षयरोग विभागातील 14 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या मोहिमेचे प्रमुख शहर क्षयरोग अधिकारी डॉ.बी.बी.माळी हे असणार आहेत व महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही मोहिम शहरात राबविली जाणार आहे.

या मोहिम अंतर्गत सर्व क्षयरोग संशयितांची थुंकी नमुना तपासणी करण्यात येणार आहे. थुंकी दूषित रुग्ण आढळल्यास त्याला तात्काळ औषधोपचार सुरु करण्यात येणार आहे.

थुंकी नमुना अदूषित आढळल्यास त्यांची क्ष-किरण तपासणी मोफत करण्यात येणार आहे. यासाठी अशासक्रीय संस्था असलेल्या दिशा फाऊंडेशन फंड उपलब्ध करुन देणार आहेत.

तसेच एक्सरेमध्ये शंका असल्यास सदर रुग्णांची सीबीनॅट मशीनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या सर्व निदान चाचण्या मोफत केल्या जाणार असून उपचार देखील मोफत उपलब्ध आहे.

या मोहिमेमुळे समाजामध्ये क्षयरोगाबद्दल जनजागृती होवून क्षयरोगाचे निदान लवकर होण्यास मदत होणार आहे व क्षयरोग उच्चाटन होणेकामी मदत होणार आहे.

यासाठी मोहिमेदरम्यान घरी भेट देणार्‍या आरोग्य कर्मचारींना सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख, महापौर कल्पना महाले व तसेच सर्व पदाधिकारी तसेच अधिकारी वर्ग धुळे महानगरपालिका, धुळे यांचे मार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*