फागणे येथे लोकसहभागातून नाला खोलीकरण

0

फागणे । काटेरी झुडपांचे वलय असलेल्या येथील कोती नदीची लोकवर्गणी व लोकसहभागातून साफसफाई तसेच खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा लोकनियुक्त सरपंच विलास चौधरींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

येथील कोती नदीपात्राला गेल्या काही वर्षांपासून काटेरी झुडपांचे वलय निर्माण झालेले असून गाळाचे प्रमाणही वाढलेले असल्याने नदीचे पात्र खुपच अस्वच्छ झालेले आहे.

नदीच्या आजबाजूला लोकवस्ती असल्याने येथील अस्वच्छतेमुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालेला होता. गेल्या काही वर्षांपासून अल्पपावसामुळे नदीपात्र कोरडेच आहे.

पुर्वी नदीत बर्‍यापैकी पाणी वहात असे, पुरही येत असल्याने वाढत्या पाण्यामुळे वाळूचे प्रमाणही बरेच होते व नदीपात्रही स्वच्छ रहात असे.

परंतू हल्ली नदीपात्र कोरडे झालेले असून नदीपात्रातील वाळूही वाहून नेल्याने ठिकठिकाणी खड्डे निर्माण झालेत. वाळू कमी झाल्याने गाळाचे प्रमाणही वाढले. यामुळे नदीपात्रास अस्तव्यस्त स्वरुपात वाढणार्‍या काटेरी झुडपांचे वलय निर्माण झाले.

पावसाळ्यात खोलगट खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी व डास, मच्छरांचे साम्राज्य वाढल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेला होता.

कोती नदीही नदी राहिलेली नसून तिला गटारीचे स्वरुप आलेले होते. त्यामुळे प्रथमच लोकनियुक्त सरपंच म्हणून पदभार स्विकारलेल्या विलास चौधरींनी नदी पात्राची झालेली दुरावस्था लक्षात घेवून लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून नदीपात्राची स्वच्छता करण्याचा संकल्प व्यक्त केला.

त्यानुसार येथील कोती दीनपात्राची साफसफाई तसेच खोलीकरण व रुंदीकरणाचे कामही त्यांनी हाती घेतले असून या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले.

यापुर्वीच सरपंच विलास चौधरींनी लोकसहभाग लोकवर्गणी व श्रमदानाच्या माध्यमातून येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एमआय टँक परिसरात दोन मोठ्या विहिरी खोदण्याचे कामही सुरु केलेले आहे.

त्यातच संपुर्ण नदीपात्राची स्वच्छता तसेच खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पुर्ण झाल्यास येथील कोरडी झालेली नदी ही प्रवाहीत होण्यास मदत होणार असल्याने परिसरातून सरपंच विलास चौधरींनी हाती घेतलेल्या कामांबद्दल समाधान व आनंदही व्यक्त केला आहे.

या शुभारंभप्रसंगी उपसरपंच कैलास पाटील, बाळापुरचे सरपंच प्रकाश मराठे, माजी सरपंच भूषण पाटील, शिवाजी अहिरे तसेच ग्राम पंचायत सदस्य विक्रम पाटील, महेश अहिरे, राजेश बडगुजर, युवराज पाटील, भास्कर पाटील, अतीक भील, कैलास अहिरे, शामकांत सोनार, भैय्या पाटील, वसंत पाटील, भिकन पाटील, सुभाष पाटील, भालेराव पाटील, धनराज पाटील, संदीप चौधरी, नवल पाटील, जगदीश पाटील, भोला पाटील आदींसह असंख्य ग्रामस्थांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

*