धुळे बाजार समितीचे कामकाज बंद : व्यापार्‍यांचे आडमुठे धोरण रास्तारोको आंदोलन करणार! – हमाल-मापाडी संघटना

0

धुळे । शासनाच्या नियमाप्रमाणे माथाडी मंडळ वसुली करते व लेव्हीची रकम भरावी लागते. त्यामध्ये हमाल मापाडी यांच्या मजुरीचा काहीही संबंध येत नाही, परंतु बाजार समितीचे कामकाज तरीही बंद करण्यात आले आहे. त्वरित बाजार समितीचे कामकाज सुरु करावे, अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धुळे हमाल मापाडी कामगार संघटनेने दिला आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

धुळे बाजार समितीमध्ये 8 जानेवारी 1994 पासून माथाडी कायदा लागू झालेला आहे. पूर्वी 8 जानेवारी 1994 मध्ये शेतकरी हा लेव्ही देत होता, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सदरची लेव्ही ही व्यापारी (खरेदीदार) यांच्याकडून घेण्याचा आदेश झाला आहे.

सन 2010 पासून व्यापारी हे आतापर्यंत लेव्ही देत आहेत, परंतु व्यापार्‍यांनी यापुढे लेव्ही देणार नाही, असे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला कळविले आहे. त्यांच्या आडमुठे धोरणामुळे व्यापार्‍यांनी 27 नोव्हेंबरपासून बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे शेतकर्‍यांचे व हमाल मापाडी कामगारांचे आर्थिक नुकसान होत असून यामुळे हमाल मापाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तरी बाजार समितीचे चेअरमन व व्यापार्‍यांनी संयुक्त बैठक घेवून यावर तोडगा काढावा, अशी मागणी धुळे हमाल मापाडी कामगार संघटनेने केली आहे. लेव्ही ही शासनाच्या नियमाप्रमाणे माथाडी मंडळ वसुल करते व लेव्हीची रकम भरावी लागते.

त्यामध्ये हमाल मापाडी यांच्या मजुरीचा काही संबंध येत नाही. त्वरित तोडगा काढून बाजार समितीचे कामकाज सुरु करावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा हमाल मापाडी कामगार संघटनेने दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर, हमाल मापाडी संघटनेचे नेते हेमंत मदाने, भिकन चौधरी, राजू गवळी, रमेश पाटील, श्रावण चौधरी, रतन वाघ, श्रावण वानखेडे, आनंदा माळी, दत्तू माळी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

*