अक्कलपाड्यामुळे जलस्त्रोत वाढले – रोहिदास पाटील

0

धुळे । दि.28 । प्रतिनिधी-अक्कलपाडा प्रकल्प,गिरणा डावा कालव्यातून तालुक्यात पाणी आणले.पांझरेवर ठिकठिकाणी बंधारे यांसह तालुक्यातील तलाव, धरणांची उंची वाढवून पाण्याची क्षमता वाढविली.

त्यामुळे पाण्याचे स्त्रोत वाढले. तरीही नैसर्गिक संकट आणि वारंवार पडणार्‍या दुष्काळावर मात करण्यासाठी जवाहर ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यात पाणी अडविणे व जिरविणे ही सिंचन चळवळ हाती घेतली.

त्याची फलश्रूती तालुक्यात आज दिसत आहे. असे प्रतिपादन राज्याचे माजी कृषी मंत्री रोहिदास पाटील यांनी एका समारंभात केले.

रोहिदास पाटील यांच्या संकल्पनेतून आणि आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जलयुक्त शिवार आणि जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टतर्फे तालुक्यातील जुनवणे येथे नाला खोलीकरण व रूंदीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी श्री. पाटील बोलत होते.

ते  म्हणाले की, सौंदाणे गावापासून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला. धुळे तालुक्यात एकूण 53 गावात 277 बंधार्‍यांचे खोलीकरणाचे काम पूर्ण केले आहे.

ज्यामुळे आज या बंधार्‍यांची पाणी साठविण्याची क्षमता 3 अब्ज 37 कोटी 83 लक्ष लिटर एवढी झाली आहे. ज्यामुळे काम केलेल्या परिसरात एकूण 6587 हेक्टर शेतीला आणि 1953 एवढ्या सिंचन विहीरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते आहे.

तर 16 विंधन विहीरींनाही त्याचा उपयोग होत आहे. 21 नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहीरींची पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे.

तालुक्यातील नांदुर नाल्यातील बंधारा खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाचा प्रारंभ रोहिदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. असेही रोहिदास पाटील यांनी यावेळी सांगितले.

जलयुक्त शिवार आणि जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट यांच्या सहकार्याने जुनवणे येथे नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामास प्रारंभ झाला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला माजी मंत्री पाटील यांच्यासह सरपंच दिपक पाटील, माजी सरपंच साहेबराव पाटील, अजबराव पाटील, भटू पाटील, भिकन पाटील, किशोर पाटील, नरेंद्र पाटील, शांताराम पाटील, सुभाष पाटील, मधुकर पाटील, आबा पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*