महावितरणला आली जाग : 27 वर्षापूर्वीच्या जीर्ण तारा बदलल्या !

0

कापडणे । दि.28 । प्रतिनिधी-येथील गोकुळ उत्तम पाटील यांचा गुरांचा गोठा व परीसरातील घरांवर, गेल्या आठवड्यात तब्बल चारदा विजेच्या मुख्य तारा तुटल्या.

या विजेचा तार पडल्याने गोकुळ पाटलांसह, सालदार, तीन गाई व दोन म्हशींना विजेचा तीव्र धक्का बसला. यामुळे एक गाय व पारडू नंतर दगावले.

यात सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी विद्युत वितरण एखादी मोठी घटना होण्याची प्रतिक्षा करतयं की काय? असा सवाल करत दै.देशदूतने हा विषय लावुन धरला होता. याची दखल घेत, या भागातील मुख्य वीजेच्या जीर्ण तारा 27 वर्षानंतर नुकत्याच बदलण्यात आल्या आहेत.

ढंढाणेच्या ज्या परीसरात जीर्ण झालेल्या तारा वारंवार तुटण्याचा प्रकार होत होता. त्या भागातील तारा महवितरणाने बदलुन दिल्या असल्या तरी तिसगांव-ढंढाणे परीसरात मृत्यूचा सापळा ठरतील अशा अनेक ठिकाणी परीस्थिती आहे.

या भागातीलही वीजेच्या जीर्ण तारा बदलुन घेण्याची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे. एखाद्या अतीमागास व आदिवासी बहुल भागालाही लाजवेल अशी परिस्थिती ढंढाणेत महिण्याभरापासुन झाल्याचेही देशदूतने वेळोवेळी मांडले आहे.

या वारंवारच्या घटनांनी ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले असुन याबाबत गंभीर होणे गरजेचे असल्याचे तसेच विद्युत वितरणाचे अक्षम्य दुर्लंक्ष येथील नागरीकांच्या जीवावर उठणारे ठरत असल्याचेही देशदूतने मांडले होते.

विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे गोकुळ पाटील(ढंढाणे) यांचे सुमारे सव्वा ते दीड लाखांचे नुकसान झाले असुन त्याची भरपाई मिळण्याची मागणीही होत आहे.

ढंढाणेसह परीसरात विजेच्या तारा तुटणे नित्याचेच झाले होते. विद्युत वितरण कंपनीच्या स्थानिक अधिकार्‍यांना वेळोवेळी तोंडी व लेखी सुचना देऊनही या विभागाचे अक्षम्य दुर्लंक्ष होत होते.

2-4 दिवसात करतो अशी उत्तरे नित्याची झाली होती. दोन जनावरे तर दगावली आता काय मनुष्यहानीची वाट पाहु नका व ज्या भागात आवश्यक असेल त्याठिकाणच्याही जीर्ण तारा बदलवा अशी मागणी गोकुळ पाटील,पोपट पाटील, रावसाहेब चित्ते, शरद पाटील, अमोल पाटील, दादाभाई, कमलेश पाटील, छगन भावसाहेब, किशोर पवार आदींनी केली आहे.

दै.देशदूतने हा प्रश्न वारंवार लावुन धरल्याने, त्याची दखल घेत विद्युत वितरण कंपनीने या जीवघेण्या जीर्ण तारा बदलल्याने ग्रामस्थांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

*