शहरात आठ दिवसात पाच घरफोड्या

0

धुळे । दि.27 । प्रतिनिधी-शहरातील साक्री रोडवरील कालिकानगरात घरफोडीची घटना घडली. घरमालक बाहेरगावी गेले असल्याने नेमका कितीचा ऐवज चोरीस गेला, याची माहिती मिळू शकली नाही.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

कालिकानगरात प्लॉट नं.1 मध्ये राहणारे दीपक वसंत पाटील यांच्या बहिणीचे 13 दिवसापूर्वी निधन झाल्याने उत्तरकार्यासाठी आई-वडीलांसह ते बहिणीच्या सासरी सटाणा तालुक्यातील खेडेगाव येथे गेले होते.

त्यामुळे त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी संधी साधून वॉल कंपाऊंडवरुन उडी मारुन घरात प्रवेश केला. त्यानंतर दरवाजाचे कुलुप करवतीने कापून प्रवेश मिळविला.

घरातील लोखंडी कपाट फोडून त्यातील दागिने व अन्य साहित्य चोरुन नेले. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. परिसरातील नागरिकांनी पोलिस आणि दीपक पाटील यांना ही माहिती कळविली.दीपक पाटील धुळ्यात आल्यानंतरच नेमका किती ऐवज चोरीस गेला, याची माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले.

पिंपळनेर येथे घरफोडी – पिंपळनेर, ता.साक्री येथील संजयनगरात काल भरदिवसा चोरी झाली. धर्मा समत्या कोकणी यांच्या घरातून चोरट्यांनी रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने चोरुन नेले. धर्मा कोकणी यांनी पोलिसांत खबर दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

देवपुरात घरफोडी- नगावबारी परिसरातील कल्याणी बंगल्यामागे असलेल्या राजनगरात काल दि. 26 रोजी एकाच रात्रीतून दोन ठिकाणी घरे फोडण्यात आली.

या दोन्ही घरांचे घरमालक घरी नव्हते. त्यामुळे नेमका कितीचा ऐवज चोरीला गेला, हे समजू शकले नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

शहरातील नगावबारीजवळील केंद्रीय शाळेच्या परिसरातील नवीन वसाहती रात्रीच्या वेळी चोरट्यांनी संधी साधून एकाच रात्रीत दोन घरे फोडली.

यात राजनगरातील प्लॉट नं. 26 मध्ये राहणारे सैन्यदलातील जवान युवराज कुवर यांचे निवासस्थान आहे. कुवर सध्या छत्तीसगड येथे कार्यरत आहेत.

त्यानिमीत्त त्यांचा परिवार छत्तीसगड येथे होते. त्यामुळे त्यांचे घर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने चोरट्यांनी घराच्या तळमजल्यावरील खोलीच्या दरवाजाचे लोखंडी ग्रिल भिंत फोडून घरात प्रवेश करून हात साफ केला.

याच भागात प्लॉट नं. 47 मध्ये रहिवासी चेतन साळुंखे यांच्या घराच्या लोखंडी दरवाजाची जाळी कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

घरातून पाच हजार रुपये रोख आणि दागदागिने चोरीस गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र तेदेखील घरी नसल्याने नेमकी किती ऐवज चोरीस गेला हे समजू शकले नाही.

महिलेचा विनयभंग – जुने धुळे भागातील सुभाष नगरात राहणार्‍या महिलेचा विनयभंग करुन तिला त्रास देणार्‍या नकाणे रोडवरील तरुणासह 17 मोबाईल धारकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

26 वर्षीय गृहिणीने पश्चिम देवपूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार दि.23 व 24 च्या दरम्यान संघरत्न उर्फ बंटी रघुवीर मोरे, रा.एसआरपी कॉलनी रोड, देवपूर याने फिर्यादीच्या परवानगीशिवाय तिच्या नावाचे फेसबुक अकाऊंट उघडून अश्लिल संभाषण केले.

त्याचबरोबर आणखी 16 मोबाईल धारकांनी देखील अश्लिल संभाषण केले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एपीआय भांडे हे करीत आहेत.

गस्त वाढविण्याची मागणी
गेल्या आठवड्यात दोन ठिकाणी चोरीची घटना घडली होती. एकाच आठवड्यात चार ठिकाणी चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुवर यांच्या घरातून काही पितळी भांडे, वस्तू चोरीला गेल्याचे त्यांचे शेजारी श्यामकांत सोनार यांनी सांगितले. मात्र याबाबत पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र चोरीच्या घटना लक्षात घेता पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

*