प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेसाठी शिष्टमंडळाचे जलसंपदामंत्र्यांना साकडे

0

दोंडाईचा । वि.प्र.-प्रकाशा-बुराई उपसा सिंचन संघर्ष समिती शिष्टमंडळाचे प्रमुख पं.स.सदस्य सतिष पाटील, मनोहर देवरे, नाना सोवनणे यांनी जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांची भेट घऊन हा प्रश्न तातडीने सोडवावा म्हणून साकडे घातले.

यावेळी शिष्टमंडळाने योजनेची परिस्थिती लक्षात आणून दिली. प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेचे काम केल्या 17 वर्षापासून संथगतीने सुरु आहे.

पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेत योजना समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. अन्यथा, विलंब होत असेल तर सारंगखेडा बॅरेजमधून अमरावती धरणापर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकणे व स्वतंत्र लिफ्ट करावी.तापी नदीचे पावसाळ्यातील पुराचे वाहून जाणारे पाण्यानेदेखील अमरावती धरण भरु शकते.

फोफादे, ता. साक्री धरणातून सध्या बुराई नदीचे ओव्हर फ्लोने वाहून जाणारे पाणी अमरावती धरणात टाकता येवू शकते. हे अंतर केवळ 2 कि.मी.आहे.

हे काम शेतकरी स्वयंखर्चाने करु शकतात. बुराई नदीवरील ज्या गावांना पाणी मिळते, त्याचे पाणी आरक्षित व संरक्षित राहून उरलेल्या पाण्याने ही अमरावती धरण भरता येवू शकते, हे शिष्टमंडळाने लक्षात आणून दिले.

ना. गिरीष महाजन यांनी शिष्टमंडळाच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित वरीष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला.

या योजनेमुळे उमरावती प्रकल्प व वाडीशेवाडी प्रकल्प, विखरणचा तलाव, बलदाणे येथील लहान अमरावती प्रकल्प पाण्याने पुर्ण भरतील.

या प्रकल्पासाठी कालव्याचे कामही पुर्ण झालेले आहे. किमान वाडीशेवाडी व अमरावती या प्रकल्पावर शासनाचा 200 ते 250 कोटी खर्च झालेला आहे.

त्यामुळे प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेमुळेच अमरावती व वाडीशेवाडी प्रकल्प भरता येवू शकतात असे शिष्टमंडळाने ना. गिरीष महाजन यांना पटवून दिले.याप्रसंगी ना. गिरीष महाजन यांनी माजीमंत्री डॉ. हेमंतराव देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला व प्रकल्पावर चर्चा केली. यावेळी संघर्ष समितीचे सतीष पाटील, पं.स.सदस्य मनोहर देवरे, नाना सोनवणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*