चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव महाराज मंदिरात विविध कार्यक्रम

0

धुळे । दि.25। प्रतिनिधी-शहरातील खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरात तळी भरण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी होती.

‘येळकोट येळकोट जय मल्हार’ चा जयघोष करत भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतले. यानिमित्ताने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तीन क्विंटल बाजारीच्या भाकरी आणि साडेचारशे किलो वांग्याचे भरीत करण्यात आले होते.

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा रस्त्यावर प्राचीन खंडेराव मंदिर आहे. चंपाषष्ठीनिमित्त मंदिरात देव दिवाळी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम झाले.

मल्हारी सप्तशतीचे पठण केले गेले. सप्तशती पाठाची गुरुवारी सांगता झाली. रामदेवबाबा भजनी मंडळातर्फे भजनाचे कार्यक्रम झाले. चंपाषष्ठीनिमित्त खंडेराज महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर आरती झाली.

भाकरी आणि वांग्याचे भरीत करून नैवेद्य दाखविण्यात आला. विधिवत पूजन केले. महापौर सौ. कल्पना महाले यांच्याहस्ते मंदिरात आरती करण्यात आली.

यावेळी सुनील महाले, अजय अग्रवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर तळी भरण्याचा कार्यक्रम झाला. सायंकाळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला.

खंडेराव मंदिर परिसर मित्र मंडळाकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भरीतसाठी 120 किलो कांद्याची पात, 70 किलो मेथी, मिरची 100 किलो इतर सामग्रीचा वापर करण्यात आला.

खास जळगाव येथून तीन आचरी बोलावण्यात आले होते.मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करून फुलांची सजावट केली होती. गोंधळ ऐकण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली होती. अनेकांनी मंदिरात भंडारा उधळला.

LEAVE A REPLY

*