‘नार-पार’चा लाभ धुळे तालुक्यालाही मिळावा ! – आ.कुणाल पाटील

0

धुळे । दि.24 । प्रतिनिधी-नार-पार-औरंगा आणि अंबिका या चार पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावून पश्चिमेकडे अरबी समुद्रात मिळतात.

या पाण्याचा लाभ व्हावा, यासाठी नार -पार, गिरणा तापी नदीजोड प्रकल्पाची कार्यवाही सुरू आहे. हे पाणी गिरणा प्रकल्पात आणले जाणार असून धुळे तालुक्यालाही याचा लाभ होणार आहे. यासाठी गिरणा पांझण डावा कालव्याचे क्षेत्र वाढविणे आणि हरणबारी, चणकापूरपासून थेट कानोलीपर्यंत आणण्याची गरज आहे. नार-पार योजनेत उत्तर महाष्ट्रावर होणार अन्याय सहन केला जाणार नाही असेही आ.कुणाल पाटील यांनी सांगितले.

नाशिक येथे ग्रामविकास मंत्री ना.दादा भूसे यांच्या उपस्थितीत नार-पार योजनेची आढावा बैठक झाली. या बैठकीला आ.कुणाल पाटीलदेखील उपस्थित होते.

यावेळी आ. पाटील यांनी धुळे जिल्ह्याची बाजू प्रभावीपणे मांडली. या योजनेचा लाभ धुळे तालुक्यालाही होवू शकतो, असे स्पष्ट करून गिरणा डावा कालव्याचे क्षेत्र वाढवून त्यासाठी पाणी आरक्षित करण्यात यावे अशी मागणी केली.

बैठकीत बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, नार पारचे पाणी धुळे तालुक्यालगत असलेल्या मालेगाव तालुक्यातही आले पाहिजे ही ना.दादा भुसे यांची मागणी रास्त आहे. त्यामुळेच ते पाणी पुढे धुळे तालुक्यात आणणे शक्य होणार आहे.

सध्या गिरणा प्रकल्पातून पांझण डावा कालव्याच्या माध्यमातून येणारे पाणी पुरेसे नाही. धुळे तालुक्यातील शिरूड परिसरातील गावांना या कालव्यातून पाणी शेतीसाठी दिले जाते.

धुळे तालुक्यातील हा भाग कायमच दुष्काळी राहिला आहे. चारा टंचाई,पाणी टंचाईच्या संकटाला नेहमीच सामोरे जावे लागते. सिचंनाची अनेक कामे करूनही निसर्गाच्या अवकृपेमुळे या भागातील शेती कोरडवाहू बनत चालली आहे.

या सर्व दुष्काळी परिस्थितीचा विचार केला असता ही योजना पूर्ण झाल्यानंतर गिरणा डावा कालव्याच्या लाभ क्षेत्रात वाढ होवून इतर गावांचा समावेश केला जाईल.

सिंचनाचा त्यांनाही लाभ होईल, यासाठी प्रयत्न केले जातील.यावेळी आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, गिरणा, पांझरा, बोरी, मोसम या उपनद्यातील खोर्‍यात लगतच्या नार पार खोर्‍यातील पाणी आणल्याशिवाय या भागाचा विकास होणे शक्य नाही.

म्हणून नार पार योजनेचा फेरअहवाल तयार करतांना धुळे, मालेगाव, चाळीसगाव, पारोळा यांसह जळगाव जिल्ह्यातील गावांचा विचार करून पाणी आरक्षित करण्यात यावे, अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी केली.

नार पार योजनेच्या लढयात आम्ही खांद्याला खांदा लावून लढा देवू. महाष्ट्राच्या हक्काचा एकही थेंब इतरत्र वळविला जावू देणार नाही.

यासाठी सर्व भेदाभेद बाजूला ठेवून लढणार आहोत, त्यासाठी धुळे आणि जळगाव जिल्हयातील लोकप्रतिनिधींनाही सोबत घेवून हा प्रश्न मार्गी लावावा. उत्तर महाष्ट्राची ताकद पुन्हा एकदा दाखवून द्यावी असेही आवाहन आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

*