धुळे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांशी शिक्षणमंत्री ना.तावडेंनी साधला संवाद

0

कापडणे, ता.धुळे । दि.24 । प्रतिनिधी-धुळ्यातील निकुंभे येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची सहयाद्री अतिथीगृह येथे भेट घेतली आणि त्यांच्याशी शालेय शिक्षणाबरोबरच विविध विषयांवर संवाद साधला.

धुळे जिल्ह्यात लोकसहभागातून डिजिटल क्लासरुम सुरु झाले आहे आणि याच पार्श्वभूमीवर धुळ्याच्या निकुंभे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरुमचा कसा फायदा होतो हे शालेय शिक्षण मंत्री ना. विनोद तावडे यानी यावेळी जाणून घेतले.

यावेळी मुंबईभेटीवर आलेल्या मुलांना शिक्षणमंत्री यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. इतिहास कसा वाटतो ? इतिहासात आपण काय शिकलो ? ई लर्निंग म्हणजे नेमके काय ? शाळेत जायला आवडते का? कोणता विषय आवडतो ? गणित आणि इंग्रजी या विषयाची भीती वाटते का ? मुंबईला पहिल्यांदा कोण आले ? मुंबई आवडली का ? मुंबईत काय काय पाहिले ? मुंबईत आल्यावर समुद्र पाहिला का? अशा अनेक प्रश्नांना सह्याद्री अतिथीगृहात उपस्थित विद्यार्थ्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. तर उपस्थित विद्यार्थ्यांनीही शालेय शिक्षण मंत्री यांनी आपल्या शाळेत येण्यासाठी आमंत्रण दिले.

डिजिटल प्रकारच्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची कौशल्ये वाढतात. कारण मुलांना पुस्तकातील धडे थेट पडद्यावर चित्रे, चित्रफितींच्या माध्यमातून दिसतात.

पण असे करीत असताना वाचनही महत्वाचे असून दररोज वाचन करण्याचा सल्ला यावेळी श्री. तावडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

धुळे जिल्ह्यातील निकुंभे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आठवीपर्यंत असून या शाळेची पटसंख्या 339 आहे. तर या शाळेत एकूण 10 शिक्षक आहेत.

या शाळेत लोकसहभागातून पहिला डिजिटल क्लासरुम आणि स्वतंत्र संगणक कक्ष सुरु करण्यात आला आहे. याच शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता.

जि.प,शाळा निकुंभे सहलीला आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मा.शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेबांशी अर्धा तास संवाद साधण्याची संधी मिळाली.साहेबांनी मुलांना जेवण दिले.

तसेच उद्या गोरेगाव फिल्म सिटीची पासही मिळाली..,….शिक्षण मंत्री खेड्यातील मुलांशी प्रत्यक्ष सँवाद..,.ही महाराष्ट्रात आगळीवेगळी भेट

LEAVE A REPLY

*