वीज तारांखाली तुम्ही घरे का बांधली ?

0

रामकृष्ण पाटील,कापडणे । दि.23-तालुक्यातील ढंढाणे येथील गोकुळ पाटील यांच्या गुरांच्या गोठ्यावर व जवळपासच्या घरांवर तब्बल चारवेळा वीजतारा तुटून पडल्या. गेल्या आठवड्यात दोनवेळा अशाप्रकारच्या घटना घडल्या असून दोन दिवसात अनुक्रमे म्हशीचे पारडू व गाय दगावली आहे.

या घटनेत गोकुळ पाटील व सालदार श्री.नाईक थोडक्यात बचावले. याबाबत ग्रामस्थांनी निवेदन दिल्यानंतर यावर उपाययोजना करण्याऐवजी विद्युत वितरण कंपनीने सरळ ग्रामस्थांनाच नोटीस काढल्या असून ‘आमच्या विज तारांखाली आपण घरे का बांधली? असा उफराटा सवाल वीज अधिकार्‍यांनी नोटीसांमध्ये उपस्थित केल्याने कंपनीच्या कारभाराबाबत आश्चर्य व संतापही व्यक्त केला जात आहे.

वारंवार घडणार्‍या या घटनांनी ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.विद्युत वितरण कंपनीने याबाबत गांभीर्य न दाखविता अक्षम्य दुर्लंक्ष केलेले आहे.

विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे गोकुळ पाटील(ढंढाणे) यांचे सुमारे सव्वा ते दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

तिसगांव- ढंढाणेसह परिसरात विजेच्या तारा या मृत्यूचा सापळा ठरत आहेत. गाय तडफडत मरतांना पाहुन शेतकरी गोकुळ पाटील यांना आपले अश्रू आवरता आले नाही.

ढंढाणेसह परीसरात विजेच्या तारा तुटुन पडणे नित्यांचे झाले आहे. विद्युत वितरण कंपनीच्या स्थानिक अधिकार्‍यांना वेळोवेळी तोंडी व लेखी सुचना देऊनही या विभागाचे अक्षम्य दुर्लंक्ष होत आहे.

सबंधित विभाग एखादी मोठी दुर्घटना होण्याची प्रतिक्षा करतोयं काय? असा सवाल विद्युत वितरण उपस्थित करीत आहे. सलगच्या या घटनांनी गावातुन संप्तत प्रतिक्रीया उमटत आहेत.

दोन जनावरे तर दगावली आता काय मनुष्यहानीची वाट पाहतायं का? असा सवाल गोकुळ पाटील,पोपट पाटील, रावसाहेब चित्ते, शरद पाटील, अमोल पाटील, दादाभाई , कमलेश पाटील, छगन भावसाहेब, किशोर पवार आदींनी केला आहे. म्हशीचे पारडू व गायीच्या श्री.पाटील यांचे सुमारे सव्वा ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे.

या घटनेने ग्रामस्थांतुन तीव्र रोष व्यक्त होत आहे. या घटनेचा विद्युत वितरण कंपनी व देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या वतीने 80 हजार नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.

याबाबत सबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर शेतकर्‍यांना विज वितरण कंपनीने भरीव मदत करण्याची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.

याबाबत निवेदन दिल्यानंतर यावर उपाययोजना करण्याऐवजी विद्युत वितरण कंपनीचा उफराटा कारभार पाहावयास मिळाला. कंपनीने सरळ ग्रामस्थांनाच नोटीस काढल्या आहेत.

सबंधीत ग्रामस्थांनी त्या स्विकारल्या नसल्याचे समजते. ग्रामस्थांच्या वडिलोपार्जित जागांबाबत विजवितरणास नोटीसा देण्याचा अधिकार दिला कोणी असाही सवाल उभा राहत आहे.

LEAVE A REPLY

*