अवकाळी पावसामुळे बाजार समितीत शेतमालाचे नुकसान

0

धुळे । दि.23 । प्रतिनिधी-येथील बाजार समितीत उघड्यावर पडलेले धान्य व कांदा अवकाळी पावसामुळे पाण्याखाली गेले. यामुळे लाखो रुपयांचे व्यापार्‍यांचे नुकसान झाले आहे.

तापमानाचा पारा खाली आलेला होता. बोचरी थंडी पडली होती. परंतु अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे.

तापमानाचा पाराही वर चढला असून उकाडा जाणवत आहे. दि.21 नोव्हेंबर रोजी सायंकाळनंतर वातावरणात बदल झाला. वादळ सुरु होवून ढगांचा गडगडाट सुरु झाला.

त्यानंतर सायंकाळी शहरात पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले.

मंगळवार हा बाजाराचा दिवस असल्यामुळे मालाची आवक बाजार समितीत चांगल्या प्रकारे झाली होती. तर बाजार समितीत उघड्यावर धान्य, कांदा व्यापार्‍यांनी ठेवले होते.

परंतु अचानक आलेल्या पावसामुळे धान्य व कांदा पाण्याखाली गेला. यात लाखोंचे नुकसान झाले.पोत्यांमध्ये भरुन ठेवलेले धान्य व माल व्यापार्‍यांनी पथारीवर तसेच ठेवले होते.

अचानक पाऊस आला आणि धान्याचे पोते पाण्याखाली गेले. तसेच शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणलेला मालही पाण्यामुळे खराब झाला.

अवकाळी पावसाचा फटका व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांनाही बसला. यात लाखोंपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*