शिशुगृह येथे राष्ट्रीय दत्तक सप्ताह साजरा

0

धुळे । दि.21 । प्रतिनिधी-येथील अपंग व कुष्ठरोगी स्वावलंबन संस्था संचलित, शिशुगृह येथे राष्ट्रीय दत्तक सप्ताह साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमास दत्तक प्रक्रियेशी संबंधित तसेच शिशगृहाशी संबंधित विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांना दत्तक प्रक्रियेशी संबंधीत माहिती देण्यात आली तसेच दत्तक प्रक्रियेतील बदल व नियमांबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी दत्तक प्रक्रियेची माहिती देतांना शिशुगृहाचे अधिक्षक अतुलचंद्र बिर्‍हाडे म्हणाले की, दत्तक प्रक्रिया ही आता ऑनलाईन झाली आहे. तसेच सदर प्रक्रिया ही सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसर्च अ‍ॅथोरिटी, दिल्ली मार्फत चालविली जाते.

त्यामुळे दत्तक प्रक्रियेमध्ये दत्तक संस्थांचा हस्तक्षेप हा पूर्णपणे थांबला आहे. जर एखाद्या पालकांना बाळ दत्तक घ्यावयाचे असेल तर त्यांना आधी ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी व होम स्टडी रिपोर्ट साठी संस्थेची निवड करावी लागते.

सदरील संस्था ही पालकांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांचा होम स्टडी रिपोर्ट तयार करून तो रिपोर्ट अपलोड करते व त्यानंतर सदरील पालक हे प्रतिक्षा यादीत दाखल होतात असे त्यांनी सांगितले.

संस्थेत आजपर्यंत शंभरहून अधिक बाळ दाखल झाले होते. त्यामध्ये हरलेले, टाकून दिलेले, परित्याग केलेले अशा बाळांचा समावेश होता. त्यापैकी 75 पेक्षा जास्त बालकांना दत्तक देण्यात आले आहे व उरलेल्या सर्व बाळांना संस्थेने स्वत:च्या खर्चाने शोध लाऊन, जाहिराती करून संबंधित बाळांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अपंग व कुष्ठरोगी स्वावलंबन संस्था संचलित, शिशुगृह, धुळे ही शासनमान्य दत्तक संस्था असून गेल्या 15 ते 20 वर्षांपासून दत्तक क्षेत्रात कार्यरत आहे.

परंतु आजपर्यंत संस्था शासनाच्या अनुदानापासून वंचित आहे. तसेच दत्तक प्रक्रियेमध्ये मिळणारी रक्कम ही तटपुंजी असून त्यामध्ये बाळांचा सांभाळ करणे देखिल दत्तक संस्थांना अवघड जात आहे व त्यातच कर्मचार्‍यांना देखिल तटपुंज्या वेतनात काम करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने दत्तक संस्थांना अनुदान मंजुर करून कर्मचार्‍यांना वेतन सुरु करावे अशी मागणी बिर्‍हाडे यांनी केली.

राष्ट्रीय दत्तक सप्ताहात दत्तक प्रक्रिया या विषयावर जनजागृती करण्यात आली. तसेच ज्या पालकांना बाळ दत्तक घ्यावयाचे असेल त्यांनी शिशुगृहास समक्ष भेट द्यावी अथवा शासनाच्या वेबसाईटवर लॉगिन करावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले.

कार्यकमाला जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रत्ना वानखेडकर, जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्षा प्रा.रत्नमाला पाटील, सदस्य प्रा.डॉ.महाजन , जिल्हा महिला बालविकासाचे परिविक्षा अधिकारी अर्चना पाटील, संस्थेचे सचिव लक्ष्मणराव बिर्‍हाडे, सदस्य फुलचंद अग्रवाल, अ‍ॅड.प्रसेन्नजित बैसाणे, अ‍ॅड.कविता पवार, जिल्हा सर्वोपचार रूग्णालयाचे डॉ.हटकर , सामाजिक कार्यकर्ते श्री.जगताप, श्रीमती पाटील, भारत तोलाणी, डॉ.संजय महाले, अ‍ॅड.पी.जे.गुरव आदी उपस्थितीत होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी पंकज चव्हाण, सौ.पल्लवी चौधरी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*